Headlines

पीएम किसानचा 23 वा हप्ता:2.79 लाख शेतकऱ्यांसाठी 30 जूनपर्यंत KYC बंधनकारक




अमरावती जिल्ह्यातील २ लाख ७९ हजार ५८ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या २३ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी त्यांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत केवायसी न झाल्यास या शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता रखडण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. तेवढीच मदत राज्य शासनातर्फेही केली जाते. बियाणे, खते, औषधे तसेच शेतीच्या विविध खर्चासाठी हा निधी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतो. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ जून रोजी १७ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर यंदाही त्या तारखेच्या आसपास २३ वा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे. तथापि, अधिकृत घोषणेअभावी शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. प्रशासनाच्या मते, योजनेचा लाभ सुरळीत ठेवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संबंधितांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याशिवाय, सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अनोळखी लिंक, फोन कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. अधिकृत माहितीसाठी शासनाच्या संकेतस्थळाचा किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अंजनगाव बारी येथील शेतकरी राजेंद्र डकरे यांनी सांगितले की, “पीएम किसानचा प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरतो. पेरणीपूर्वी मिळणारी आर्थिक मदत शेतीच्या खर्चासाठी उपयोगी पडते. शासनाने हप्ता लवकर वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *