![]()
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २५ हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या व्यक्तींसह विविध सामाजिक संस्थांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून रक्तपेढीचे विभाग प्रमुख डॉ. आशिष वाघमारे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. श्रीकांत झापर्डे, डॉ. राहुल खराटे, डॉ. प्रफुल्ल पेंदाम आणि अजय साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक, धार्मिक व राजकीय संस्थांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वंदे मातरम फाउंडेशन, शिव शाहू फुले आंबेडकर ब्लड डोनर ग्रुप, खासदार अनिलजी बोंडे ३६५ दिवस रक्तदान मोहीम, ओ. एस. एस. मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन, सेवा संकल्प फाउंडेशन, भीम ब्रिगेड संघटना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. अलीम पटेल रक्तदान समिती, जीवन रेखा संघर्ष बहुउद्देशीय संस्था आणि श्री संत काशिनाथ महाराज संस्थान, नांदगाव पेठ यांचा प्रामुख्याने समावेश होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी बोलताना, “रक्तदान हेच जीवनदान आहे,” असे म्हटले. त्यांनी जास्तीत जास्त अमरावतीकरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. यासाठी जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे आणि समुपदेशक योगेश पानझाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समुपदेशक योगेश पानझाडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता गायधने, रश्मी मुळे, अविनाश जाधव, मनोज भाकरे, गजानन इंगळे, जयवंत गावंडे, मंगेश उमप, प्रवीण कळसकर आणि अशोक अडवाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व मान्यवर आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या नियमांनुसार ‘रक्तदानाची शपथ’ घेतली.
Source link
अमरावतीत जागतिक रक्तदाता दिनी गौरव सोहळा:25 वेळा रक्तदान करणाऱ्यांसह सामाजिक संस्थांचा सन्मान