Headlines

पुणे येथे 'इग्नाईट-2026' आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन:केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयईईई पुणे सेक्शनद्वारे संयुक्त आयोजन




पुणे येथे केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स संचालित केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इग्नाईट-२०२६’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ते १९ जून २०२६ या कालावधीत होणार असून, यात आंतरराष्ट्रीय संशोधक आणि उद्योगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ. अजय फुलंबरकर, अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, प्राचार्य डॉ. सुहास खोत, ‘इग्नाईट’च्या चेअरपर्सन डॉ. निकिता कुलकर्णी आणि ‘आयईईई’चे प्रतिनिधी प्रा. रहिमराजा शेख उपस्थित होते. कल्याण जाधव यांनी सांगितले की, परिषदेचे उद्घाटन बुधवार, १७ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नगर रस्त्यावरील हॉटेल हयात पुणे येथे होणार आहे. आयआयआयटी रायपूरचे माजी कुलगुरू व संचालक डॉ. पी. के. सिन्हा यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, आयईईई पुणेचे अध्यक्ष डॉ. अमर बुचडे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, उद्योग क्षेत्रातील नेते आणि देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्राचार्य डॉ. सुहास खोत यांनी माहिती दिली की, परिषदेसाठी देश-विदेशातील संशोधक, शैक्षणिक तज्ज्ञ, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून एकूण १,५४८ संशोधन प्रबंध प्राप्त झाले होते. त्यापैकी ३५४ प्रबंध सादरीकरण आणि प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. ही परिषद ऑनलाईन व ऑफलाईन (हायब्रिड) पद्धतीने होणार आहे. यात ७८ प्रबंध प्रत्यक्ष (ऑफलाइन) तर २७६ प्रबंध ऑनलाइन सादर केले जातील. यामुळे जगभरातील संशोधकांना या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, स्टॅनफर्ड विद्यापीठ, अमेरिका यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधकांचाही यात सहभाग आहे. परिषदेत सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व सायबर सुरक्षा, सिग्नल प्रोसेसिंग व व्हीएलएसआय डिझाईन, ऊर्जा प्रणाली व अक्षय ऊर्जा, स्थापत्य व पर्यावरण अभियांत्रिकी, उत्पादन व ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग तसेच अनुप्रयुक्त विज्ञान व आंतरविद्याशाखीय संशोधन या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. परीक्षित महल्ले आणि कॉग्निझंटचे प्रिन्सिपल आर्किटेक्ट पवन देशपांडे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे, असे डॉ. खोत यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *