![]()
सव्वा महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी (दि. १५) तालुक्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली आणि शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. जिल्हा परिषद व खासगी अनुदानित अशा एकूण ४५६ शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. अनेक गावांमध्ये सजविलेल्या बैलगाड्या व ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अजंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेशोत्सव कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गखोल्यांची सजावट, रांगोळ्या, स्वागत कमानी आणि ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच तुषार आहिरे, उपसरपंच रोशनी सूर्यवंशी, मुख्याध्यापिका उषा शेलार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. पहिलीतील विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. दरम्यान, सोयगाव कलेक्टर पट्टा येथील उज्ज्वल शाळेत विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मुख्याध्यापिका अर्चना गरुड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले, तर बुंदी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विराणे येथील नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातही प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या वेषभूषा साकारल्या होत्या. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण करत आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. प्रतिनिधी | सिन्नर बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीतील नवोदितांना गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून लेझीम व ढोलांच्या गजरात विद्यालयात प्रवेश देण्यात आला. प्राचार्य अशोक बागूल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला माजी सरपंच विजय उगले, धनंजय उगले, धोंडीराम देशमुख, दशरथ रोडे, भाऊसाहेब शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे वैभव असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या ३० माजी विद्यार्थ्यांचा (जवान) गौरव करण्यात आला. तसेच मुंबई पोलीस दलात दाखल झालेला माजी विद्यार्थी सचिन कांगणे याचाही सत्कार झाला. सचिनने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना देत विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचे आवाहन केले. कार्यक्रमात नवोदय, स्कॉलरशिप, एनएमएमएस आणि ‘सुपर १००’ मधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. माजी सरपंच विजय उगले यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतूक केले, तर प्राचार्य बागूल यांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षात अभ्यासाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज व पालक संघाचे उपाध्यक्ष भाऊराव गुंजाळ यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. मिष्टान्न भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिनिधी | चांदवड धोडंबे येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकर्षक सजविलेल्या बैलगाडीतून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेली बैलगाडी या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली. शैक्षणिक संदेशांनी सजविलेले बैल आणि रंगीबेरंगी फुलांनी नटविलेल्या बैलगाडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षण हेच खरे सामर्थ्य आणि ‘चला शाळेत जाऊया’ यांसारखे संदेश यावेळी झळकत होते. प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागतासह त्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेची गुणवत्ता, अनुभवी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे धोडंबे विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची भरघोस उपस्थिती लाभली असून, प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षकवर्ग असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे प्रतिपादन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश उशीर यांनी केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलास उशीर, अभिनव बालविकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय सोनवणे, एकरुखेचे पोलीस पाटील संपतराव जाधव, एम. के. उशीर, ई. बी. उशीर, मुख्याध्यापक एस. एम. वंजारी, पर्यवेक्षक संजय पवार आदींसह ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.
Source link
प्रवेशोत्सव:बैलगाडी अन् ट्रॅक्टरमधून नवागतांची मिरवणूक, सव्वा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा