Headlines

बारामती विधानसभा पोटनिवडणूक:सुनेत्रा पवार यांना शिवसंग्राम पक्षाचा जाहीर पाठिंबा, अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा




शिवसंग्राम पक्षाने बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या पोटनिवडणुकीत शिवसंग्राम सक्रिय प्रचारात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या अकाली निधनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले की, स्वर्गीय विनायकराव मेटे आणि अजित पवार यांच्यातील संबंध केवळ राजकीय नव्हते, तर वैचारिक आणि सामाजिक पातळीवरही अतूट होते. त्या नात्याचा मान राखत शिवसंग्रामकडून हा पाठिंबा देण्यात येत आहे. महाराष्ट्राची परंपरा सहानुभूती, बांधिलकी आणि सामाजिक ऐक्याची आहे. एखाद्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची संस्कृती महाराष्ट्राने नेहमीच जपली आहे. याच परंपरेचा आदर राखत, शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या अजित पवार यांच्या कुटुंबीयांना साथ देणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य असल्याचे डॉ. मेटे यांनी नमूद केले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावाची चर्चा असल्याबाबत विचारल्यावर डॉ. मेटे म्हणाल्या, “प्रशासकीय अधिकारी म्हणून मी अनेक वर्षे काम केले आहे. त्यामुळे ही जबाबदारी सांभाळण्याची क्षमता माझ्यात आहे. भविष्यात संधी मिळाल्यास महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी काही राजकीय निर्णय घ्यावा लागला, तर तो त्या परिस्थितीला अनुसरून घेतला जाईल.” विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर पक्ष टिकवून ठेवण्यात यश मिळाले असून, पुढील काळात संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. करुणा मुंडे संविधानाने दिलेल्या अधिकारात निवडणूक लढत असल्या, तरी नैतिकतेच्या आधारे निर्णय घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशोक खरात सारख्या महिला अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत होत आहे. मात्र, यामध्ये कोणी राजकारण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘एनसीईआरटी’च्या पुस्‍तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पुसणे ही अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह घटना असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *