![]()
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्यानेच सुरू झालेल्या मिसिंग लिंकवर असलेल्या पुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून तिन्ही गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या होत्या. मिसिंग लिंकवरील केबल स्ट्रे पुलाजवळ तिसऱ्या मार्गिकेवर या गाड्यांमधील फॉर्च्यूनर गाडी अचानक मध्येच थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाईची वेरना कार वेगाने येऊन फॉर्च्यूनर गाडीवर जाऊन धडकली. यानंतर वेरना गाडीने आणखी एका कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने गाड्यांमधील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले होते, तसेच गाडीतील एअर बॅग्स उघडल्याने जीवितहानी टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट येथील महामार्ग वाहतूक पोलिस आणि संबंधित आपत्कालीन यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वेगाने मदतकार्य राबवत क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. परंतु प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे ती अल्पावधीतच पूर्ववत करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महामार्ग पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सुरक्षिततेचे आवाहन केले आहे. महामार्गावरून प्रवास करताना दोन वाहनांमध्ये नेहमी सुरक्षित अंतर ठेवावे, अतिवेगात असताना अचानक ब्रेक मारण्याचे टाळावे आणि सर्व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील.
Source link
नव्यानेच सुरू झालेल्या मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात:तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, जीवितहानी टळली; वाहतूक विस्कळीत