Headlines

कल्याणी-पॅरामाउंटने 'सिंहा 4×4' चिलखती वाहन केले सादर:युरोसॅटरी 2026 प्रदर्शनात नव्या पिढीतील बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण




भारत फोर्ज लिमिटेडची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि पॅरामाउंट यांनी पॅरिस येथे आयोजित युरोसॅटरी २०२६ या जागतिक संरक्षण प्रदर्शनात ‘सिंहा ४x४’ या नव्या पिढीतील हलक्या चिलखती बहुउद्देशीय वाहनाचे अनावरण केले. हे वाहन संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. भारत, आफ्रिका, दक्षिण आशिया आणि इतर जागतिक बाजारपेठेतील सशस्त्र दलांच्या वेगाने बदलणाऱ्या गरजा आणि सुरक्षिततेची आव्हाने लक्षात घेऊन ‘सिंहा ४x४’ विशेषतः विकसित करण्यात आले आहे. हे वाहन विविध प्रकारच्या मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल. ‘सिंहा ४x४’ हे शक्ती, चपळता आणि उत्कृष्ट संरक्षण क्षमता यांचा संगम आहे. शहरी भागातील लढाया, खडतर भूप्रदेशातील टेहळणी, अंतर्गत सुरक्षा, सीमासुरक्षा, विशेष मोहिमा, नियंत्रण व समन्वय आणि जवानांची सुरक्षित वाहतूक यांसारख्या बहुउद्देशीय कामांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. या वाहनाची रचना लवचिक असून, प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ते विक्रमी वेळेत विकसित करण्यात आले आहे. भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी या प्रसंगी सांगितले की, “‘सिंहा ४x४’ हे वाहन आमच्या जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि संरक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचे प्रतीक आहे. याचे डिझाइन युरोपीय मानकांनुसार करण्यात आले असून, यात ‘नाटो’ मान्यताप्राप्त तांत्रिक घटकांचा वापर केला आहे. यामुळे भागीदार देशांमध्ये याचे उत्पादन जलद गतीने सुरू करता येईल आणि भारताचा संरक्षण उद्योग जगातील सर्वोत्तम उद्योगांशी स्पर्धा करू शकतो हे सिद्ध होते.” पॅरामाउंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष एरिक इचिकोवित्झ यांनी सांगितले की, “सशस्त्र दलांना आज अशा वाहनांची गरज आहे जी बहुउद्देशीय असतील आणि स्थानिक पातळीवर तयार करता येतील. ‘सिंहा ४x४’ हे सुरक्षा, गतिशीलता आणि परवडणारी किंमत यांचा अचूक समतोल साधणारे वाहन आहे. यामुळे भागीदार देशांचे परदेशी पुरवठा साखळीवरील दीर्घकालीन अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होईल.” स्थानिक उत्पादनाला चालना देणे आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता व स्वावलंबन वाढवणे हा या वाहनाच्या निर्मितीमागील मुख्य हेतू आहे. ही भागीदारी जागतिक संरक्षण बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांच्या औद्योगिक क्षमतेला एका नव्या उंचीवर नेणारी ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *