![]()
‘माझ्याकडे अर्ध्यातासासाठी ईडी-सीबीआय द्या. सगळ्या आधी गिरीश महाजनांना फोडतो,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. ‘महाजनांना नाही फोडले, तर मग विचारा. नाशिकच्या कुंभमेळ्यात हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार चाललाय. मी सगळं काढणार आहे,’ असा इशाराही राऊत यांनी दिला. महाराष्ट्रातील राजकीय भूकंप आणि पक्षांतराच्या नाट्यावर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “आमचे खासदार फुटल्याची आवई उठवणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी,” अशा तिखट शब्दांत राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. “संजय राऊत यांचा राजकीय आणि मानसिक तोल पूर्णपणे ढासळला आहे. ते कोणत्याही विषयावर, कोणाबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. राऊतांची भाषा राजकारणाला न शोभणारी आहे,’ असे प्रत्युत्तर मंत्री गिरीस महाजन यांनी दिले. ‘हे ऑपरेशन टायगर नव्हे, तर लाचखोरांचे टोळके’ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’चा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, “ज्याला सत्ताधारी ‘ऑपरेशन टायगर’ म्हणत आहेत, ते प्रत्यक्षात ईडी, सीबीआय आणि पैशांच्या बळावर केलेले घाणेरडे राजकारण आहे. वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही. निष्ठा विकून सत्तेच्या मागे जाणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. हा वाघांचा खेळ नसून लाचखोरांचा बाजार आहे.” ‘जनतेच्या न्यायालयात या, दूध का दूध पाणी का पाणी होईल’ राऊत यांनी महायुतीला थेट आव्हान दिले. “जर तुमच्यात एवढीच हिंमत असेल आणि तुमचे ‘ऑपरेशन’ इतकेच यशस्वी झाले असेल, तर फोडलेल्या लोकप्रतिनिधींचे राजीनामे घ्या आणि त्यांना पुन्हा जनतेच्या दारात उभे करा. निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत महायुतीमध्ये आहे का? जनताच ठरवेल की खरा वाघ कोण आणि पाळीव कोण!” असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना इतिहास विसरणार नाही’ संजय राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही कडक शब्दांत तोफ डागली. “शिवसेना हा केवळ एक पक्ष नाही तर तो एक विचार आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेंच्या निष्ठेशी ज्यांनी प्रतारणा केली, त्यांना महाराष्ट्राचा राजकीय इतिहास कधीही थारा देणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही, आज जे सत्तेच्या मांडीवर बसलेत, त्यांना उद्या रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्रातील राजकीय कलगीतुरा अधिकच धारदार होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या सातत्याच्या टीकेला आता महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला असून, त्यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ‘मानसिक तोल बिघडलाय’नाशिकमधील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आई-बहिणींवरून शिवीगाळ केली महाजन म्हणाले की, “संजय राऊत यांचा राजकीय आणि मानसिक तोल पूर्णपणे ढासळला आहे. ते कोणत्याही विषयावर, कोणाबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. कालपरवापर्यंत तर त्यांनी थेट आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्यापर्यंत मजल मारली होती. लोकशाहीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची शिवराळ भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही,” अशा शब्दांत महाजन यांनी आपला संताप व्यक्त केला. बडबडीमुळेच पक्षाचा ऱ्हास ‘तुमच्या बडबडीमुळेच पक्षाचा ऱ्हास’संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका करताना महाजन पुढे म्हणाले की, “राऊत यांच्याकडे सकाळी उठून नको ती बडबड करण्याशिवाय आता दुसरा कोणताही उद्योग उरलेला नाही. त्यांच्या याच अशा वर्तनामुळे आणि विधानांमुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. पक्षाचा झालेला ऱ्हास हा त्यांच्यामुळेच आहे. हे असेच सुरू राहिले, तर आगामी काळात त्यांच्यासोबत साधे नगरसेवकही शिल्लक राहणार नाहीत,” असा टोलाही त्यांनी लगावला. जमिनीवर काम करा ‘१७ पैकी एखादी जागा तरी जिंकून दाखवा!’ गिरीश महाजन यांनी आगामी राजकीय लढाईचे आव्हान देत राऊतांना सुनावले की, “केवळ कॅमेऱ्यासमोर बसून मागण्या किंवा आरोप करण्यापेक्षा जमिनीवर काम करा. किमान १७ जागांपैकी एखादी तरी जागा निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्या, उगीच नुसती वक्तव्ये करून वेळ वाया घालवू नका.” महाजन यांच्या या थेट विधानामुळे आता ठाकरे गट आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Source link
कलगीतुरा:संजय राऊतांचे चॅलेंज, म्हणाले- अर्ध्या तासासाठी ईडी-सीबीआय द्या, सगळ्यात आधी 'त्या' मंत्र्याला फोडतो, महाजनांचेही प्रत्युत्तर