![]()
नागपुरात ‘फ्री कॉईन’ आणि ‘मर्चंट कॉईन’ या डिजिटल करन्सीच्या नावाखाली २५ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे या महाठगांचा तब्बल १० लाख २४ हजार युजर्सकडून ५०० कोटी रुपये उकळण्याचा डाव फसला असून, अब्जावधी रुपयांची संभाव्य फसवणूक टळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून मिहुल शिवाजी दीक्षित आणि चंदीगड (पंजाब) येथून कंपनीचा मुख्य मालक राकेश मोहनलाल गर्ग ऊर्फ राकेश अग्रवाल या दोन्ही मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. हे आरोपी उपराजधानीतील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आपले जाळे चालवत होते. या भामट्यांनी फसवणुकीसाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धत वापरली होती. मुख्य आरोपी मिहुल दीक्षितच्या पत्नीने एका फिर्यादी महिलेला मिहुलचे शिक्षण आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मधील नोंदीबद्दल खोटे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर मिहुलने फिर्यादीला इंदोरा चौकातील आपल्या आलिशान कार्यालयात बोलावून ‘सीएलबीपी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या ‘फ्युचर डिजिटल अॅसेट्स’ या योजनेची माहिती दिली. या योजनेत १०० दिवसांत पैशांचे चक्रवाढ उत्पन्न आणि दरमहा लाखो रुपयांचे कमिशन मिळवून देणारी ‘चेन सिस्टीम’ सुरू करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. फिर्यादी महिलेने विश्वास ठेवून स्वतःसह २५ गुंतवणूकदारांना यात जोडले आणि तब्बल ५ लाख ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, जेव्हा त्यांनी स्वतःचे मर्चंट कॉईन आणि व्हॅलेटमधील जमा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तांत्रिक नियम पुढे करत पैसे देण्यास नकार देण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आर्थिक गुन्हे शाखेने तातडीने तपास हाती घेत दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांचे ५ बँक खाते तसेच एफडी खाती गोठवून १ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तपासादरम्यान, या बनावट कंपनीमध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यातील एकूण ३१,११७ गुंतवणूकदारांनी आधीच १५ कोटी ५८ लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचे उघड झाले. ही रक्कम पोलिसांनी वेळेत सुरक्षित केली आहे. या डिजिटल कंपनीमध्ये देशभरात १० लाखांहून अधिक युजर्स जोडले गेले असून, एकट्या नागपुरात तब्बल ३० हजार लोक या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे.
Source link
नागपुरात डिजिटल करन्सी घोटाळ्याचा 500 कोटींचा डाव उधळला:दोन मुख्य सूत्रधार जेरबंद, अब्जावधींची फसवणूक टळली