![]()
देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण आयोजित करण्यात आले होते. यात रामदास महाराज पवार, रामकृष्ण मंदिर अध्यक्ष, शिऊर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यानिमित्त ते बोलत होते. जातिकुळ माझें गेलें हरपोनि, श्रीरंगावांचुनी आनु नेंणें, किती वो शिकवाल मज वेळोवेळां, मी तया गोवळा रातलिये, अष्टभोग भोगणें माते नाहीं चाड, भक्तिप्रेम गोड लेईलेंगे माये, बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा, कांही केलिया वेगळा नव्हेगे माये, या अभंगाचे विवेचन करताना रामदास महाराज म्हणाले की, श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आता श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेलो आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे. माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचा पती, जे श्री विठ्ठल, असे माझे बाप काही केल्या आता जीवापासून वेगळे होत नाहीत, असे त्यांनी सांगितले. कीर्तनानंतर सर्व भाविकांनी विजय बनकर व संजय बनकर यांच्या वतीने आमरसाच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष भागवताचार्य पंढरीनाथ महाराज पगार, जगदीशानंद स्वामी, संतोष महाराज गायकवाड, प्रभाकर महाराज चन्ने, सारंगधर महाराज भोपळे, संत शंकर स्वामी संस्थानचे अध्यक्ष एकनाथ जाधव, घनवट, अनिल भोसले, शिवाजी साळुंके, सोपान पगार, प्रकाश साबळे, प्रवीण जाधव, भगवान घोगरे, राजेंद्र जानराव, यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता