![]()
शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाने खताचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण ११३ खत विक्री परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले असून, ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत. विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ पर्यंत राबवलेल्या या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊले उचलण्यात आली. आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित तर ६ परवाने रद्द करण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले. यापैकी २७७ केंद्रांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी विभागाने ही कारवाई शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केली आहे. पुणे जिल्ह्यात ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून, २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांच्या तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ परवाने रद्द करण्यात आले. तसेच, ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी झाली, जिथे १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले. सोलापूरमध्ये एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ परवाने रद्द करून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी होणारा गैरवापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या. खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जेजुरकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषी केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार असल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कारवाईच्या वेळी पुणे अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी निलेश गढरी आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.
Source link
कृषी विभागाची खत काळाबाजार, साठेबाजीवर मोठी कारवाई:पुणे विभागात 113 परवाने निलंबित/रद्द; 7 गुन्हे दाखल