![]()
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी
.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार विनामूल्य प्रवेश दिला जाईल.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गासह इतर प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. प्रवेशासाठी प्रथम https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन टॅबवर माहिती भरून युजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल. तयार केलेल्या युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगीन करून अर्ज भरता येईल. 11 वी, 12 वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2026 आहे.
जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह योजनेचा अर्ज भरला नाही त्यांना स्वाधार व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथील केला आहे.
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संकेतस्थळावर त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.