Headlines

छत्री तलाव परिसरात सूर्य निरीक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद:मराठी विज्ञान परिषदेने केले आयोजन, नागरिक-विद्यार्थ्यांचा सहभाग




मराठी विज्ञान परिषद आणि स्टारगेझर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील छत्री तलाव परिसरात दोन दिवसीय सूर्य निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात सुमारे ५० नागरिकांनी भेट दिली, त्यापैकी जवळपास ३० विद्यार्थी आणि पालकांनी विशेष सौर फिल्टरयुक्त दुर्बिणीद्वारे सूर्यबिंब तसेच त्यावरील सौर डागांचे (सन स्पॉटस्) प्रत्यक्ष निरीक्षण केले. यामुळे उपस्थितांना खगोलशास्त्राचा एक अनोखा अनुभव घेता आला. यावेळी उपस्थित खगोलप्रेमींना मराठी विज्ञान परिषदेचे खगोलविभाग प्रमुख विजय गिरुळकर यांनी सूर्याची रचना, सौर डागांचे स्वरूप आणि सूर्य निरीक्षण करताना घ्यावयाची काळजी याविषयी शास्त्रीय माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये खगोलशास्त्राबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने, सचिव प्रा. सुशीलदत्त बागडे, कोषाध्यक्ष रूपाली फुके तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. भविष्यातही अशा प्रकारचे विज्ञानप्रबोधनपर कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *