Headlines

चांदूर रेल्वे तालुक्यात 'फार्मर कप' स्पर्धा:40 गावांतून 48 शेतकरी गट सहभागी, उत्पादन वाढीचे नियोजन




चांदूर रेल्वे तालुक्यात पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सहभागी झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून शेतकरी एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या विविध बाबी आपल्या शेतात राबवत आहेत. स्पर्धेतील शेतकरी गट सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, तसेच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करत आहेत. यामुळे त्यांच्या खर्चात बचत होत आहे. गट सदस्यांमध्ये नियमित चर्चा करून शेतीतील समस्यांवर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक टप्प्यावर शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार शेतात आवश्यक बदल केले जात आहेत. यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत असून प्रत्येक टप्प्यावर खर्चात बचत होत आहे. सर्व गटांनी आपल्या शेतातील मातीची तपासणी करून घेतली आहे. जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकाच्या वाणांची निवड करण्यात आली आहे. सोयाबीन आणि कपाशी पेरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यात आली आहे. तसेच, सोयाबीन व तुरीला बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणीसाठी तयार ठेवले आहे. सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खत हे गट स्वतः तयार करत आहेत किंवा गावातून खरेदी करून शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. या शेतकरी गटांना पाणी फाउंडेशनचे जयकुमार सोनुले व रेणुका पोहोकार, कृषी विभागाचे मेंटर अमोल चौकडे आणि उमेदच्या मेंटर मोनिका मुनघाटे दर आठवड्याला मार्गदर्शन करत आहेत. उत्पादन वाढीसाठी गटांनी सूत्रबद्ध नियोजन केले असून, आता सर्व गट पावसाची वाट पाहत पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. सुधारित पीक पद्धतीनुसार, कापूस पिकासाठी सरी वरंबा पद्धत आणि तुरीसाठी बेड पद्धत वापरली जात आहे. निंबोळ्या जमा करून ५ टक्के निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करण्याची योजना आहे. गेल्या वर्षी हूमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने, शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातून हूमणी अळीचे भुंगे पकडण्यासाठी आपापल्या शेतात लाईट ट्रॅप लावले आहेत. या गटशेतीचा शेतीमध्ये निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल अशी अपेक्षा आहे. गटागटांमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे गावातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण होण्याच्या दिशेने चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *