![]()
असोरिया पेट्रोल पंपासमोर जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गोळीबार केल्याप्रकरणी आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन देशी कट्टे, दोन काडतुसे, चार तलवारी आणि तीन फरशे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मौलाना आझाद कॉलनी येथील रहिवासी सोहेब अहेमद एजाज अहेमद (३५) हे शनिवार, २० जून रोजी रात्री त्यांचा मोठा भाऊ अहेफाज खान आणि मित्र शेख रशीद यांच्यासह असोरिया पेट्रोल पंपासमोरील एका पानटपरीजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर देशी कट्ट्यातून गोळीबार करत चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर सोहेब अहेमद यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. नागपुरी गेटचे ठाणेदार मनोहर कोटनाके आणि पोलीस निरीक्षक जनार्धन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास मनपिया, मलिक अहेमद, दिनेश नांदे, दानिश शेख, राहुल रोडे, सागर पंडित, विक्रम नशिबकर, शशिकांत गवई आणि आसिफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Source link
गोळीबार, हल्ला प्रकरणात दहा आरोपी अटकेत:दोन देशी कट्टे, काडतुसे, तलवारी, फरशे जप्त