Headlines

मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंचा गैरव्यवहार:भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर जमिनी बळकावल्याचा आरोप, मंत्री बावनकुळे कारवाई करणार का?




मुंबई येथील मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार तसेच अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भातील चौकशी अहवाल राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केले असून, धक्कादायक बाब म्हणजे यात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता व त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मंत्री बावनकुळे काही कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती अशी की, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने मौजे वरसावे येथील विबविध्य गट क्रमांकावरील जमीनिंच्या व्यवहारांची सखोल कागदपत्रे तपासली. या चौकशी अहवालात आदिवासी जमीनिंचे बेकायदा हस्तांतरण, जमीन व्यवहारातील मोठी अनियमितता आणि महसूल अभिलेखांमधील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. तसेच तक्रारदारांच्या जमिनी आदिवासींकडून बिगर आदिवासी व्यक्तींना तसेच कंपन्यांना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. वरसावे गावातील जुन्या आदिवासी पाड्यांमधील प्रकार मीरा रोडच्या काश्मिरा पट्ट्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या वरसावे गावातील जुन्या आदिवासी पाड्यांमधील हा प्रकार आहे. इथल्या मूळ आदिवासी जमीनधारकांनी त्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार संबंधित जमीनिंवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची असलेल्या सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर संबंधितांकडून कब्जा घेण्यात आला आहे. या कंपन्यांचे मुख्य मालक नरेंद्र मेहता असून, प्रशांत केळुसकर आणि सूर्यकांत सुर्वे हे इतर संचालक आहेत. आदिवासी कुटुंबीयांनी थेट महसूल मंत्र्यांकडे घेतली धाव दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून तक्रारदारांना कसलीही दाद मिळत नसल्याने अखेर आदिवासी कुटुंबीयांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेत आपले म्हणणे मांडले. या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणात एका स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करून सखोल चौकशी करण्याचे आदेश ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी हा अहवाल तयार करून बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कारवाई करणार का? जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादर केलेल्या अहवालानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता प्रश्न केवळ इतकाच आहे की मंत्री बावनकुळे यावर काय कारवाई करतात, दोषींवर कारवाई करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *