Headlines

इर्विन रुग्णालयात पाणी शिरले, रेडिओलॉजी विभाग बंद:डफरीन, सुपरची मदत; सेवा शुक्रवारपासून पूर्ववत




अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (इर्विन) अपघात कक्षात बुधवारी सायंकाळी पाणी शिरले. यामुळे गुरुवारी दिवसभर येथील रेडिओलॉजी विभाग बंद ठेवण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि संदर्भ सेवा रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी) संबंधित विभागांची मदत घेण्यात आली. इर्विनचा रेडिओलॉजी विभाग स्वच्छ करण्यात आल्याने शुक्रवारपासून सर्व सेवा पूर्ववत सुरू होतील, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या माहितीनुसार, गुरुवारी ज्या रुग्णांना सीटी स्कॅन आणि एक्स-रे ची आवश्यकता होती, त्यांना तातडीची सोय म्हणून डफरीन व सुपर रुग्णालयात पाठवण्यात आले. दररोज मोजक्याच रुग्णांना सीटी स्कॅनची गरज भासते. त्यामुळे सुमारे सहा रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याचबरोबर, सुमारे ६० रुग्णांच्या एक्स-रे साठी सुपर स्पेशालिटी आणि डफरीन रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाची मदत घेण्यात आली. अशा प्रकारे गुरुवारी रुग्णांची सोय करण्यात आली. पावसाचे पाणी शिरल्याने बुधवारी सायंकाळी इर्विन रुग्णालयातील एकूणच व्यवस्था विस्कळीत झाली होती. पावसादरम्यान वीज खंडित झाल्याने आणि जनरेटर संपूर्ण इमारतीला वीज पुरवू शकत नसल्याने काही कक्षांमध्ये अंधार होता. वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांनाही त्रास सहन करावा लागला. जिल्हा सामान्य रुग्णालयाची दयनीय अवस्था पाहता खासदार बळवंतराव वानखडे आणि बडनेराचे आमदार रवि राणा यांनी गुरुवारी सकाळी रुग्णालयाला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रात्रभर भोगाव्या लागलेल्या त्रासाची आपबिती ऐकून घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यापूर्वीच संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून संभाव्य अडचणींचा अंदाज व्यक्त केला होता. लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतर प्रत्यक्ष उपाययोजनांना वेग मिळाल्याचे दिसून आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *