Headlines

दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात




शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सोन्याची लगड, ३.६९ लाखांची रोख आणि दुचाकी वाहनांसह एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारत दिलीप पवार (२५, रा. जुना कॉटन मार्केट, अमरावती) आणि पवन सुभाष चक्रे (३२, रा. न्यू हनुमान नगर, अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. किरण नगर भागातील रवींद्र गुप्ता यांनी १८ जून २०२५ रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. १७ जूनच्या रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर, अज्ञात चोराने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर अर्धे वाकवून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील १२ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान या चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे भारत पवार आणि पवन चक्रे यांना त्यांच्या राहत्या परिसरातून संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी स्वस्तिक किराणा दुकानातील चोरीची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी मागील दीड वर्षात शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. यामध्ये गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३, राजापेठ हद्दीतील २, बडनेरा हद्दीतील १ आणि फ्रेजरपुरा हद्दीतील ३ गुन्हे अशा एकूण ९ चोऱ्यांची कबुली दिली आहे. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार रवींद्र राजुलवार, डीबीचे प्रमुख पीएसआय राहुल महाजन, सुभाष पाटील, रज्जाक शेकुवाले, सचिन बोरकर, सुरज यादव, अखिल दळवी, जयेश परिवाले, रोशन वऱ्हाडे, प्रशांत वानखडे, सागर चव्हाण, जावेद पटेल, धर्मा शिंदे, अमोल राठोड व उमेश चुलपार यांनी केली आहे. २४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त अटक केलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी १८. ५८ लाख रुपयांचे १३४ ग्रॅम ९७० मिलिग्राम सोन्याची लगड. ३ लाख ६९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी असा एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *