Headlines

तळवेलच्या शिक्षकांचा जालिंदरनगर, वाबळेवाडी शाळांना अभ्यास दौरा:आदर्श शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी प्रेरणादायी भेट




तळवेल येथील श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत पाचही शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी जालिंदरनगर व वाबळेवाडी येथील आदर्श शाळांचा अभ्यास दौरा केला. आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपल्या शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. जालिंदरनगर आणि वाबळेवाडी शाळा राज्यातील जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संकल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. या दौऱ्यादरम्यान शिक्षकांनी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची सखोल पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांचे कृतीशील शिक्षण, आनंददायी वर्गव्यवस्थापन, परिसर विकास, प्रभावी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक-विद्यार्थी सहभागातून उभारलेले गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांचा समावेश होता. यावेळी जागतिक दर्जाच्या शाळा उभारणीचे शिल्पकार आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “शाळेचा दर्जा केवळ इमारतीवर अवलंबून नसून, शिक्षकांची सकारात्मक मानसिकता, विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच उत्कृष्ट शाळा निर्माण होते.” त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित शिक्षकांमध्ये आपल्या शाळांमध्ये परिवर्तन घडवण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली. या अभ्यास दौऱ्यानंतर श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या पाचही शाळांनी जालिंदरनगर आणि वाबळेवाडीच्या धर्तीवर आपल्या शाळा विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. या दौऱ्यामुळे शिक्षकांना आधुनिक शिक्षणाच्या नव्या दिशा मिळाल्या असून, ग्रामीण भागातही जागतिक दर्जाच्या शाळा उभारण्याच्या दिशेने संस्थेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हा अभ्यास दौरा समन्वयक मयुर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. राजाभाऊ देशमुख व जयश्री देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर डॉ. तुषार देशमुख व विशाल देशमुख यांनी दौऱ्याचे संयोजन केले. मुख्याध्यापक विनोद तिरमारे, राजेंद्र कुमरे, विद्या मेश्राम, राजेश वानखेडे, सोपान पळसपगार, निशिकांत पाटील यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *