![]()
देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात अत्यंत भरीव काम केले. त्यामुळे त्यांच्या नावाने अमरावतीत शैक्षणिक संकुल उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या संकुलासाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज, रविवारी येथे केली. पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणेला सूचना देताना त्यांनी या संकुलासाठीचा विस्तृत प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. त्यांच्यामते अलिकडच्या काळात हा प्रस्ताव प्राप्त झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात यासाठीच्या निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जातील. मार्चमध्ये तयार झालेल्या अर्थसंकल्पाच्यावेळी या संकुलाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान अर्थसंकल्पाचा धांडोळा वरचेवर घेतला जातो. त्यामुळे काही विभागाचा अखर्चित निधी संकुलासाठी वळविला जाऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेष असे की गतकाळात डॉ. पंकज भोयर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रीतरित्या उपस्थित असलेल्या अमरावतीच्या कार्यक्रमातच या संकुलाच्या बांधणीचा विषय अंतिमत: मंजूर करण्यात आला होता. त्या मुद्द्याची आठवण करुन देत त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले. या संकुलासाठी मध्यवर्ती बसस्थानकानजिकच्या जुन्या डीएड ची जागा (सायंस्कोर शाळेच्या उजव्या बाजूच्या रस्त्यालगतचा परिसर) प्रस्तावित आहे. संबंधित अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी या जागेची आज सकाळी पाहणी केली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुढील निर्देशही दिले.
Source link
शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी जागेची पाहणी:डिसेंबरमध्ये विकासकामासाठी होणार निधीची तरतूद