Headlines

महसूल अधिकारी थेट बांधावर; आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन:सेलू येथील बीबीएफ पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक‎




वाशी तालुक्यातील सेलू येथील ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. सिरसावाड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे आवाहन केले. सिरसावाड पाटील यांनी केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष शेतात उतरून सोयाबीन बियाण्यावरील बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच चाड्यावर मूठ धरून पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याचाही अनुभव घेतला. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित शेतकऱ्यांचा उत्साह वाढला. यावेळी त्यांनी बीबीएफ पद्धतीचे फायदे, कमी पावसात पिकांचे व्यवस्थापन आणि कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. भविष्यात शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक, बहुपीक तसेच गळीत धान्यांची लागवड करावी, त्यामुळे बाजारभावातील चढ-उतारांचा परिणाम कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच शेतकरी गट स्थापन करून सामूहिक शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनातही वाढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे सेलू, सारोळा, मांडवा व परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, प्रशासनाचा हा पुढाकार इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बीबीएफ पद्धतीचे फायदे बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होते, जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पिकांची वाढ जोमदार होते. कमी पावसाच्या परिस्थितीतही या पद्धतीमुळे पिकांचे नुकसान कमी होते. तण नियंत्रण, खतांचा कार्यक्षम वापर आणि उत्पादन खर्चात बचत होत असल्याने ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *