![]()
राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक आंदोलनामुळे मंत्र्यांच्या सुरक्षेची आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा आंदोलनादरम्यान NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “राज्यात सातत्याने होणारी पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ आता अजिबात सहन केला जाणार नाही,” असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. या संपूर्ण टीईटी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि या प्रकरणामागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली. शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा! विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी वारंवार विश्वासघात करणाऱ्या महायुती सरकारविरोधात हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. जोपर्यंत राज्यातील परीक्षार्थी तरुणांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या संपूर्ण ढिसाळ कारभाराची आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
संबंधित बातमी वाचा.. टीईटी पेपरफुटीतील दोषींवर‘मकोका’ लावणार- दादा भुसे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणावरून सोमवारी राज्य विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. तसेच दोषींवर थेट ‘मकोका’अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात आवश्यक बदल तपासण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले. देशाच्या नोटा छापण्यासाठी नाशिकची निवड केली जाते, मग महाराष्ट्रातील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका छापायला आग्रा कशाला हवा? असा घरचा आहेर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या गुन्ह्यातून स्पष्ट झाले की यात कोणताही महाराष्ट्रीयन माणूस नसून सर्व बाहेरचे आहेत. तिजोरीला टाळेच लावायचे नसेल तर चोरी होणारच. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने केली. सविस्तर वाचा
Source link
टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी