![]()
श्रीगोंदे तालुक्यातील कौठा परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बीएएमएसची बनावट पदवी लावून राजरोसपणे नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस बंगाली डॉ. सौरभ अधिकारी याने अखेर आपले “श्रीसान क्लिनिक’ बंद करून पळ काढला आहे. या अवैध कारभाराबाबत “दिव्य मराठी’मध्ये बुधवारी “सलाइन खुंटीला आयुष्य टांगणीला’ हे वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य विभागाने याची दखल घेतली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्तामुळे आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने या बोगस डॉक्टरने क्लिनिकला कुलूप लावून पळ काढल्याने कौठा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. वृत्त आल्यानंतर आरोग्य प्रशासन तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले. काष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित बोगस डॉक्टरला हे क्लिनिक तात्काळ बंद करण्याचे आदेश देऊन रुग्णांची दिशाभूल करणारा बनावट बोर्ड काढण्यास सांगितले. तालुका आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन आपल्यावर मोठी कायदेशीर कारवाई करणार याची खात्री पटताच, हा कथित बंगाली डॉक्टर पसार झाला. सध्या क्लिनिकबाहेरील तो बनावट बोर्ड हटवण्यात आला असून क्लिनिकला कुलूप ठोकण्यात आले आहे. संबंधित बोगस डॉक्टरने गेल्या अनेक वर्षांत नागरिकांच्या आरोग्याशी मोठा खेळ केला आहे. त्यामुळे केवळ क्लिनिक बंद होणे पुरेसे नसून, श्रीगोंदे तालुका आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी या फरार बोगस डॉक्टरचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तीव्र नागरिकांमधून केली जात आहे. बनावट पदवीच्या जोरावर ७-८ वर्षे रुग्णांची फसवणूक कौठा येथे कथित बंगाली डॉ.सौरभ अधिकारी याने ‘श्रीसान क्लिनिक’ नावाचे रुग्णालय थाटले होते. स्वतःकडे वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही अधिकृत परवाना अथवा वैध पदवी नसताना, या डॉक्टरने रुग्णांची दिशाभूल करण्यासाठी क्लिनिकवर बीएएमएस पदवीचा खोटा फलक लावला होता. गेल्या सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या क्लिनिकमध्ये येणाऱ्या निष्पाप आणि ग्रामीण भागातील गरीब रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केले जात होते. बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नाही ^ अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत आपण किमान पाच बोगस डॉक्टरांवर कडक कारवाया केल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील कौठा येथील गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर, मी स्वतः संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्या बोगस डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकाही बोगस डॉक्टरला सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारलाच जाईल. -डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर.
Source link
दिव्य मराठी इम्पॅक्ट:कारवाईच्या भीतीने क्लिनिकला टाळे ठोकून कौठ्याचा बोगस डॉक्टर पसार