Headlines

सावळेश्वर येथे उड्डाणपुलासोबतच सर्व्हिस रस्ता करा:10 जुलैला एनएचएआय कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा‎




मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असले, तरी सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, सर्व्हिस रस्त्याला तातडीने मंजुरी न मिळाल्यास दि. १० जुलै २०२६ रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काकडे यांनी दिला आहे. सावळेश्वरपाटी ते उजनी वसाहत या दरम्यान सर्व्हिस रस्ता उभारण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरकडे केली आहे. सध्या उड्डाणपुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री व मनुष्यबळ कार्यरत असल्याने, त्याचवेळी सर्व्हिस रस्त्याचे कामही हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रस्त्यासाठी स्वतंत्र निधी, मंजुरी व प्रशासकीय प्रक्रिया करावी लागणार असल्याने कामास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने आताच निर्णय घेऊन दोन्ही कामे एकाचवेळी पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या मार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अनेक अपघात घडले असून, स्थानिक शेतकरी व नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सर्व्हिस रस्ता झाल्यास स्थानिक वाहतूक सुरक्षित होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे सुलभ होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात पीर पठाण बाबा दर्गा मध्यभागी येत असल्याने त्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन कसे करण्यात येणार, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुना अरुंद पूल आजही धोकादायक ठरत आहे. उजनी वसाहतीकडून सावळेश्वर गावाकडे येताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. त्यामुळे या भागात सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. शासनाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील ^सावळेश्वर चौकातून सावळेश्वर, दारफळ आणि चिंचोलीकाटी या तीन गावांतील शेतकरी दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच सर्व्हिस रस्त्याचे काम केल्यास शासनाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. मागणी मान्य न झाल्यास १० जुलैपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल. शिवाजी काकडे, सामाजिक कार्यकर्ते दर्ग्याजवळ वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *