![]()
पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिची पोलीस कोठडी संपत आल्याने, पोलिसांनी गुरुवारी तिला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकातील तिच्या ‘लीलाकुंज’ निवासस्थानी नेले. तेथे कसून तपासणी करत महत्त्वपूर्ण वस्तू जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सियाला पुन्हा एकदा तपासासाठी तिच्या घरी नेल्यामुळे, या पंचनाम्यातून नेमके कोणते नवीन आणि महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, याबाबत पुणे आणि लोणावळा परिसरात चर्चा सुरू झाली आहे. तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यापूर्वी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येचा सराव केला होता. गंगाधाम ते लुल्लानगर रस्त्यावरील एका लहान टेकडीवर केतनला कसे ढकलायचे, याची त्यांनी आधीच तालीम केली होती. पोलिसांनी सराव केलेल्या घटनास्थळी देखील सिया आणि चेतन या दोघांना नेऊन कसून चौकशी केली आणि त्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला. १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलून हत्या केल्यानंतर, या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे नष्ट करण्यात आले आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासाठीच सियाच्या घरातून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करून तपासले जात आहे. दरम्यान, पोलीस तपासासाठी सियाला तिच्या घरी घेऊन आले असता, घरातून बाहेर पडताना तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहून अश्लील हावभाव केले. गंभीर गुन्ह्याचा आरोप असतानाही तिच्या चेहऱ्यावर दिसणारा हा मुजोरपणा आणि संतापजनक वर्तन यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर तीव्र टीका होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता लवकरच न्यायालयात ‘लास्ट सीन टुगेदर’ ही थिअरी आणि गोळा केलेले सबळ तांत्रिक पुरावे सादर करणार आहेत.
Source link
केतन अग्रवाल हत्या प्रकरण: सिया गोयलला पुन्हा घरी नेले:हत्येच्या सरावामुळे तपासाला वेग, महत्त्वाचे पुरावे जप्त