.


श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ४ व ५ जुलै रोजी विधीपूर्वक संपन्न होणार आहे. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, एअर अम्ब्रेशन, लाइम पॉइटिंग नवीन दगडी फ्लोअरिंग तसेच संरक्षक कोटिंगची कामे पूर्ण केल्याने भाविकांसाठी सुखद अनुभूती मिळणार आहे. या संवर्धन कामांमुळे मंदिरांचा ऐतिहासिक वारसा जपत त्यांचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित केले आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर, बाजीराव पडसाळी, मारुती मंदिर,परिवार देवतांच्या मंदिराच्या मूळ दगडी वास्तूवर आतून टाइल्सचे आवरण व बाहेरील बाजूस रंग देण्यात आल्यामुळे बेसॉल्ट दगडाची नैसर्गिक श्वसनक्षमता कमी झाली होती. त्यामुळे जीर्णोद्धारामध्ये टाइल्स काढून एअर ॲब्रेशन तंत्राद्वारे दगडावरील रंग स्वच्छ करण्यात आला. दगडांच्या सांध्यांमध्ये लाइम पॉइटिंग करण्यात आले. लाकडी भागांची दुरुस्ती व पॉलिश करण्यात आले. शिखरावरील सिमेंट प्लास्टर काढून त्याजागी चुन्याचा वापर करून पारंपरिक पद्धतीने काम पूर्ण करण्यात आले व पर्यावरणपूरक रंग देण्यात आला आहे.
बाजीराव पडसाळ या परिसरातील तात्पुरते पत्र्याचे छत काढून नैसर्गिक हवा व प्रकाशाचा पुरेपूर वापर होईल तसेच भाविकांना विश्रांतीसाठी आच्छादित जागा उपलब्ध होईल, अशा प्रकारे कायमस्वरूपी हेरिटेज स्वरूपाचे शेड उभारण्यात आले आहे. यासोबत एअर अम्ब्रेशन, लाइम पॉइटिंग नवीन दगडी फ्लोअरिंग तसेच संरक्षक कोटिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मारुती मंदिराच्या भिंतींना तडे गेले होते व त्या बाहेरच्या बाजू फुगल्या होत्या. या मंदिराची काळ्या बेसॉल्ट दगडाचा व चुन्याच्या मोर्टारचा वापर करून पुनर्बांधणी करण्यात आली.
विटा व चुन्याच्या मोर्टारमधील नवीन शिखर उभारून त्यास पर्यावरणपूरक रंग देण्यात आला. व्यंकटेश मंदिर जसेच्या तसे उभे केले. श्री व्यंकटेश मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील असून मंदिराच्या बाहेरील भिंतींना तडे गेले होते, भिंती बाहेरच्या दिशेने फुगल्या होत्या. प्रत्येक दगडाला क्रमांक देऊन स्वतंत्र नोंद घेण्यात आली. स्वाइल बॅग सपोर्ट या तंत्राच्या सहाय्याने दगड उतरविण्यात आले.