![]()
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खांदेपालटाबाबत अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या रंजक विधान केले. “तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला असला तरी राजकीय वर्तुळात मात्र नव्या समीकरणांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सहकार क्षेत्रात काम करण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. सामंत म्हणाले, “आमची जिल्हा बँकेची निवडणूक जवळ आली असल्याने मला आता सहकार क्षेत्रात यावेसे वाटत आहे. प्रवीण दरेकर साहेब, मलाच आशीर्वाद द्या! भाषणांमधून सहकारात राजकारण नसावे असे सांगितले जाते; पण ते प्रत्यक्षात असते की नाही हे मला ठाऊक नाही. कोकणात सहकार क्षेत्र एवढे वाढलेले नाही.’ सामंत यांच्या याच विधानाचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय शैलीत उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रातील पहिली ग्रामीण पतपेढी कोकणातील कणकवली येथे सुरू झाली. म्हणजेच सहकाराची मुहूर्तमेढ कोकणानेच रोवली आहे. त्यामुळे तिथे स्कोप खूप आहे, काळजी करू नका. सामंतजी, तुमची इच्छा बघता तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला आहे.’ भाजप अर्थ खात्यानंतर आता “सहकार’ही खेचणार? केंद्रीय सहकार मंत्रालयाची धुरा स्वतः अमित शाह सांभाळत असल्याने भाजपसाठी हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या महाराष्ट्रात हे खाते अजित पवार गटाच्या बाबासाहेब पाटलांकडे आहे. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू आमदार प्रवीण दरेकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भाजप दीर्घकाळापासून अनुकूल आहे. आगामी मंत्रिमंडळ फेरबदलात दरेकरांचा समावेश करून भाजप अजित पवार गटाकडून सहकार खाते आपल्याकडे घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईत आयोजित सोहळ्यात वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष व आमदार विनय कोरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सहकार भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले. सामंतांनी व्यक्त केली सहकार क्षेत्रात काम करण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी बंद झालेला ‘शिक्षण निधी’ येत्या महिनाभरात पुन्हा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. याच वेळी ‘सहकारी महाराष्ट्र’ मासिकाच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख करत फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांच्यावर थेट नाव न घेता निशाणा साधला. ‘सकाळी ९ वाजता भोंगा न वाजवताही उत्तम संपादक होता येतं हे प्रवीण दरेकरांनी दाखवून दिलं आहे,’ असा टोलाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
Source link
मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण:उदयजी, तुम्हाला सहकार विभाग द्यावा का?- मुख्यमंत्री फडणवीस