![]()
सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान साहेबराव नागणे यांनी केले. उपरी (ता. पंढरपूर) येथील विलासराव देशमुख हायस्कूलमध्ये प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक प्रतिनिधी प्रशांत नागणे, मुख्याध्यापक शिवाजी नागणे, अतुल नागणे, प्रवीण नागणे, चारुशीला नागणे, कराटे प्रशिक्षिका राधिका चौधरी, लक्ष्मण कुंभार, अमोल खिलारे आदी उपस्थित होते. यावेळी मुलींना शालेय वयातच जर स्वसंरक्षणाचे योग्य धडे मिळाले, तर त्या स्वतःचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे समर्थ बनतील. कोणत्याही संकट समयी किंवा अनुचित प्रसंगाला त्या अत्यंत धाडसाने सामोरे जाऊ शकतील. यामुळे समाजात अन्याय-अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच चाप बसेल. शालेय मुलींच्या सुरक्षेचा विचार करता शासनाने सर्व शाळांमध्ये कराटे प्रशिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि स्वसंरक्षणाची भावना अधिक बळकट होईल. तसेच, महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात जनजागृती होऊन सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण करण्यासही मोठी मदत होईल.
Source link
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर