Headlines

संत मुक्ताबाई मार्ग:पालखी मार्गाची दुरवस्था; रिधोरे, माढा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, 2 वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतरही रस्ता मृत्यूचा सापळा‎




पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रिधोरे ते माढा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. २४ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. २० जुलै रोजी रिधोरे, वडशिंगे मार्गे पालखीचे माढा येथे आगमन होणार आहे. मात्र तालुक्यात प्रवेश होताच पालखीचे स्वागत खड्ड्यांद्वारेच होणार, असे चित्र आहे. रिधोरे ते माढा हा बार्शीकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. अनेक व्यापारी, विद्यार्थी याच रस्त्याने प्रवास करतात. अवघ्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण झाले, तरी आज रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शासन पालखी मार्गासाठी विशेष निधी देत असूनही रस्ते लवकर खराब होत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तात्काळ दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. माढा शहरातील बाजार तळावर मुक्ताबाईंची पालखी विसावते. येथून हाकेच्या अंतरावर रस्ता खचून दहा ते पंधरा फुटांचा खड्डा पडला आहे. त्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. गेली दोन वर्षे दुरुस्तीची मागणी करूनही साबांवि कडून केवळ आश्वासनांची पाने तोंडाला पुसली जात आहेत. त्यामुळे यंदाही तिसऱ्या वर्षी वारकऱ्यांना पाण्याच्या डबक्यातूनच मार्गस्थ व्हावे लागणार आहे. ^रिधोरे- माढा पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. काम तात्काळ सुरू न झाल्यास कारवाई करू. माढा शहरातील पालखी मार्गावर साचणाऱ्या पाण्याबाबतही उपाययोजना करू. तसेच शासन पालखी मार्गासाठी विशेष निधी देत आहे. – संभाजी नागरगोजे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *