![]()
दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी घराकडे निघालेल्या धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींवर वाटेतच संकट कोसळले. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात मसूर नजीक धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींना घेऊन जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, ३ चालकांसह १२ पोलीस प्रशिक्षणार्थी असे एकूण १५ जण जखमी झाले आहेत. आंदोलनामुळे मार्ग बदलला आणि अपघात घडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदराच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. धुळ्याहून कोल्हापूरकडे जाणारी ही खासगी ट्रॅव्हल्स बसही महामार्ग सोडून रहिमतपूर-मसूर या ग्रामीण मार्गावरून कराडच्या दिशेने प्रवास करत होती. याच प्रवासादरम्यान मध्यरात्री अडीच वाजता मसूरजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बसला मोठा अपघात झाला. मसूर पोलिसांकडून तात्काळ बचावकार्य मध्यरात्रीच्या अंधारात अपघात झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बसमधील अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेच्या साहाय्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी प्रशिक्षणार्थी पश्चिम महाराष्ट्रातील या अपघातात जखमी झालेले १२ पोलीस प्रशिक्षणार्थी हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील हे रहिवासी असून, ते धुळे येथे आपले पोलीस प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. दिवाळीच्या सणासाठी ते आनंदाने आपल्या घरी निघाले होते, मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. या घटनेमुळे प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या मसूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत असून, रस्त्याची परिस्थिती आणि चालकाचा ताबा सुटण्याचे नेमके कारण शोधून काढले जात आहे. ————— हेही वाचा.. ऊसदराचा तिढा सुटला!: कोल्हापुरात 3900+100+200 चा फॉर्म्युला ठरला; सांगली, साताऱ्यात तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा शेट्टींचा इशारा
तिन दिवसांपासून ऊसाच्या पहिल्या हप्त्यावरून कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये तापलेले राजकीय आणि सामाजिक वातावरण अखेर शांत झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला प्रति टन ४५०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी करत पुणे-बंगळुरू महामार्गावर पुकारलेले ‘चक्काजाम आंदोलन’ अखेर स्थगित करण्यात आले आहे. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात ४२०० रुपयांच्या हप्त्यावर तडजोड झाली असून, ऐन दिवाळीच्या तोंडावर हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आपणच एक पाऊल मागे घेतल्याचे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा
Source link
साताऱ्यात पोलिस प्रशिक्षणार्थींच्या बसला भीषण अपघात:दिवाळीच्या सुट्टीसाठी धुळ्याहून कोल्हापूरकडे जाताना घडली दुर्घटना,15 जखमी