![]()
स्थानिक महान येथील काटेपूर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा दिवसेंदिवस अत्यंत झपाट्याने खालावत चालला असून धरणातील पाणी शेकडो फूट दूर गेले आहे. पाणी आटल्याने जलाशयाच्या पोटात गडप झालेली पुरातन मंदिरे, जुनी गढी, विहिरी आणि धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांचे जुने अवशेष आता पूर्णपणे उघड्यावर आले आहेत. धरणाच्या काठावर वसलेल्या कोथळी, जांभरूण, देवदरी, धानोरा आणि फेट्रा यांसह परिसरातील अनेक लहान-मोठ्या गावांपासून पाणी कित्येक पटीने मागे सरकले आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने महान धरणाची पाणीपातळी अवघ्या २५ टक्क्यांच्या पुढे जाऊ शकली नाही. विशेषतः मालेगाव तालुक्यातून उगम पावून महान धरणाला मिळणाऱ्या मुख्य काटा-कोंडाळा नदीतून यंदा पाण्याचा अपेक्षित प्रवाह आलाच नाही. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने आटत असून तो सध्या अवघ्या १३.५४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पाण्याची पातळी कमालीची घसरल्यामुळे ऐन हिवाळ्यातच परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, महान काटेपूर्णा अभयारण्य वन्यजीव विभागाने सन २०१८ मध्ये पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी आणि त्यांना बसण्यासाठी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात व काठावर १० ते १२ कृत्रिम टेकड्या उभारल्या होत्या. पाणी ओसरल्याने तब्बल ९ वर्षांनंतर या टेकड्या पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. या टेकड्यांवर आता मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे जंगलातील देशी-विदेशी पक्षी एकाच ठिकाणी जमा होऊन बसताना दिसत आहेत. काटेपूर्णा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी वन्यजीव विभागातर्फे महान धरणात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या माध्यमातून पर्यटकांना अभयारण्यापासून वाघागड येथील गुप्तेश्वर महादेव संस्थान व गंगामातेच्या मंदिरापर्यंत जलसफर घडवत धरण व जंगलाची माहिती दिली जात असे. मात्र, यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही, अभयारण्याकडील पाणी शेकडो फूट दूर जाऊन केवळ गाळ उघडा पडला आहे.
Source link
‘महान’च्या जलसाठ्यात घट; टेकड्या उघड्यावर:वन्यजीव विभागाने पक्ष्यांसाठी 2018 मध्ये उभारल्या होत्या टेकड्या