![]()
नागापूर एमआयडीसी येथील रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येणाऱ्या विविध अडचणी, परीक्षा तयारी, अभ्यासाचे नियोजन तसेच नियमित उपस्थिती याबाबत शिक्षकांनी पालकांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय दरेकर म्हणाले, विद्यालयातील सर्व शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. गुणवंत शिक्षकांमुळे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागत असून या यशाचे श्रेय विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांना जाते. वर्गशिक्षक संतोष उरमुडे यांनी विद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे गुणवत्तावाढ उपक्रम, नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग, पालक-शिक्षक संवाद आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती पालकांना दिली.
Source link
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षक-पालक संवाद गरजेचा:रामराव चव्हाण विद्यालयात पालक मेळावा उत्साहात