![]()
अन्न व औषध प्रशासनाने आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून राज्यातील लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कृत्रिम दूध भेसळीच्या आंतरजिल्हा संघटित जाळ्याचा पर्दाफाश केल्याचे सांगण्यात आले.
.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत एकाच वेळी ही धडक कारवाई करण्यात आली. आधुनिक गुप्तवार्ता आणि सप्लाय चेनच्या अचूक विश्लेषणावर आधारित या महाकारवाईत एकूण १ कोटी ४७ लाख ९३,९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २०,००० लिटर संशयित रासायनिक दूध जागीच नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी २६ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ नुसार मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा केवळ कायद्याचा भंग नसून समाजाविरुद्धचा गंभीर गुन्हा असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
कारवाईचा तपशील आणि छाप्यांची आकडेवारी अशी
- एकूण जप्त मुद्देमाल १.४८ कोटी
- नष्ट केलेले संशयित दूध २०,००० लिटर
- एकूण गुन्हे दाखल आरोपी२६ आरोपी
- गोळा केलेले दुधाचे नमुने ४९ नमुने
- निलंबित केलेले अन्न परवाने ५ परवाने
- बंद केलेल्या आस्थापना ४ व्यवसाय केंद्रे
पाच जिल्ह्यांत या प्रमुख आस्थापनांवर पडले छापे
- पुणे जिल्हा : मे. नवकार डिस्ट्रिब्युटर (अवसरी बुद्रुक, मंचर), मे. जय श्रीराम डेअरी फार्म (पिंपळगाव खडकी), गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र (कुडूस, खेड) आणि सह्याद्री डेअरी (कवठे यमाई, शिरूर)
- सोलापूर जिल्हा: मे. हेमंत कॉर्पोरेशन, मे. डेलीविश ॲग्रो डेअरी, आनंदयोगी दूध संकलन (पिलीव, माळशिरस) आणि इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स लि. संचालित सोनाई चिलिंग सेंटर (पिळीव).
- जालना जिल्हा: मे. मातोश्री दूध डेअरी (जळगाव सपकाळ, भोकरदन).
‘मास्टरमाइंड’ व अटकसत्र
स्किम्ड मिल्क पावडर, व्हे पावडर, डिटर्जंट, शाम्पू, इमल्सिफायर आणि पामतेलाचे भयानक रासायनिक मिश्रण करून हे कृत्रिम दूध बनवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे पांढऱ्या दुधाचा हा काळाबाजार थेट ग्रामीण भागातील दूध संकलन आणि चिलिंग सेंटर्सपर्यंत (दूध शीतकरण केंद्र) पोहोचला होता. कायदेशीर सल्लागाराच्या मदतीने कायद्याच्या पळवाटा शोधून हे रॅकेट राजरोसपणे सुरू होते. एफडीएने तपासाअंती दुधाचे ४९ नमुने गोळा केले असून तातडीने ५ अन्न परवाने निलंबित केले आहेत, तर ४ आस्थापनांचे व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुशांत बाबनराव हिंगे याला मंचर (पुणे) येथून अटक करण्यात आली असून त्याला बेकायदेशीर सल्ला देणारा संदीप लोढा हादेखील पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. एकूण २६ आरोपींपैकी १३ प्रमुख आरोपींना सध्या अटक करण्यात आली असून त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इनसाइड स्टोरी
सध्या अटकेत असलेले आरोपी
१३ आरोपी (५ दिवसांची पोलिस कोठडी) यानंतर सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अटकेतील प्रमुख संशयित
सोनू ऊर्फ चैतन्य घोरपडे (माळशिरस, सोलापूर), प्रमोद घोरपडे (राहुरी, अहिल्यानगर) आणि विविध चिलिंग सेंटर्सचे चालक.