![]()
मुंबईतील कबुतरांमुळे वाढणाऱ्या आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत अत्यंत भावनिक पद्धतीने उपस्थित केला. आपल्या आईचे निधन फुफ्फुसांच्या इंटरस्टिशियल लंग डिसीज (ILD) या गंभीर आजारामुळे झाल्याचे सांगताना ते भावुक झाले. कबुतरांच्या विष्ठेमुळे (ड्रॉपिंग्ज) हवेत पसरणाऱ्या घटकांमुळे हा आजार बळावतो, असा दावा करत त्यांनी सरकारने तज्ज्ञ समिती नेमून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. राम कदम यांनी सभागृहात सांगितले की, १२ जून रोजी त्यांच्या आई धोंडूबाई शिवाजी कदम यांचे निधन झाले. आयुष्यभर नामस्मरण करणाऱ्या आपल्या आईला शेवटची दोन वर्षे अत्यंत वेदनादायी अवस्थेत काढावी लागली. ते म्हणाले की, त्यांच्या आईला ILD (इंटरस्टिशियल लंग डिसीज) हा फुफ्फुसांचा गंभीर आजार झाला होता. या आजारावर ठोस औषध उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी उपचारादरम्यान रुग्णाला सतत ऑक्सिजनवर ठेवावे लागते आणि आजार वाढत गेल्यानंतर प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात, असे नमूद केले. कदम यांनी सांगितले की, “माझी आई सलग १५-१५ मिनिटे खोकायची. इतका वेळ अखंड खोकल्यामुळे ती बेशुद्ध पडायची. हीच अवस्था अनेक ILD रुग्णांची असते.” ‘कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार बळावतो’ या आजाराबाबत आपण सविस्तर माहिती घेतल्याचे सांगत राम कदम म्हणाले की, कबुतरांच्या विष्ठेमुळे हवेत पसरणारे सूक्ष्म घटक आणि संसर्गजन्य जीवाणू-फंगस यामुळे ILD सारखा आजार बळावू शकतो. त्यांनी हिस्टोप्लाझ्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सॅल्मोनेलोसिस आणि अॅलर्जिक आजारांचा उल्लेख करत कबुतरांच्या विष्ठेमुळे विविध प्रकारचे आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात, असे सांगितले. ‘कबुतरांना जगण्याचा अधिकार; पण नागरिकांचाही विचार करा’ राम कदम यांनी स्पष्ट केले की, ते कबुतरांच्या विरोधात नाहीत आणि त्यांना दाणे टाकणे पूर्णपणे बंद करण्याचीही त्यांची भूमिका नाही. “जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे, तसाच प्राण्यांनाही आहे. मात्र लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचाही विचार झाला पाहिजे,” असे ते म्हणाले. ‘नॅशनल पार्कमध्ये स्थलांतर का करू नये?’ राम कदम यांनी सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि ब्रिटनमधील कबुतर व्यवस्थापनाच्या पद्धतींचा उल्लेख केला. त्यांच्या मते, अनेक देशांमध्ये कबुतरांचे स्थलांतर (Relocation), जन्मनियंत्रण (Contraception) आणि ट्रॅपिंग यांसारख्या उपाययोजना केल्या जातात. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (नॅशनल पार्क) मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी, कबुतरांचे तेथे नियोजनबद्ध स्थलांतर करण्याचा विचार का केला जात नाही, असा सवाल सरकारला केला. ‘दीड कोटी मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न’ मुंबईत दीड कोटीहून अधिक लोक राहतात. त्यांच्यापैकी अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना ILD सारखे आजार होतात. त्यामुळे केवळ कबुतरांचाच नव्हे, तर नागरिकांच्या जीवाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे राम कदम म्हणाले. त्यांनी सरकारला विनंती केली की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून भविष्यात अशा प्रकारचे मृत्यू टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी राम कदम यांनी या विषयावर तज्ज्ञ समिती स्थापन करून वैज्ञानिक अभ्यास करण्याची मागणी केली. समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांची सरकारला सूचना राम कदम यांचे निवेदन ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, राम कदम यांनी मानवी आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा सभागृहात मांडला आहे. त्यांच्या मातोश्रींचे निधनही याच आजारामुळे झाले आहे. त्यामुळे शासनाने या विषयाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक असल्यास तज्ज्ञ समिती नेमावी आणि योग्य उपाययोजना करण्याबाबत कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. हे ही वाचा… जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 50 लाखांचा ‘रेट’?:विधान परिषदेत अनिल परबांचा गंभीर आरोप; भाजप आमदारानेही दिला दुजोरा मुंबईत नगरसेवक होण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. जात पडताळणी समितीत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांचा ‘रेट’ असल्याचा दावा करत त्यांनी सभागृहात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचे सांगत काही प्रमाणात या आरोपांना दुजोरा दिला. सविस्तर वाचा… RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर आरोपांची तत्काळ दखल घेत सरकारने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मोठी घोषणा केली आहे. सविस्तर वाचा…
Source link
कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाला:विधानसभेत भावुक झाले राम कदम, कबुतरखाने नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्याची मागणी