.

एकीकडे शासनाकडून शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि आधुनिक शाळांच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र दुसरीकडे खेडीलिहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची १९५६ सालची जुनी व पत्र्याची इमारत आजही विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत उभी आहे. सततच्या पावसामुळे या इमारतीची अवस्था जीर्ण झाली असून ती कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत सुमारे १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात पत्र्याच्या छतामधून पाणी गळणे, भिंतींना मोठे तडे जाणे, लाकडी व लोखंडी संरचनेची झालेली झीज आणि कमकुवत झालेला पाया यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षरशः धोक्याच्या सावटाखाली सुरू आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांनी व पालकांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन नवीन शाळा इमारतीची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून संबंधित प्रशासनाने तातडीने या जीर्ण इमारतीची पाहणी करून नवीन शाळा इमारतीस मंजुरी द्यावी किंवा पर्यायी सुरक्षित इमारतीत वर्ग सुरू करावेत, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर डापके तसेच दत्ता पा. डापके, गजानन पा. कळात्रे, रोहन डापके, ज्ञानेश्वर पा. साबळे, वाळूबा पा. डापके, गणेश कळात्रे, रंगनाथ चव्हाण, समाधान पा. डापके, राम डापके, ज्ञानेश्वर कळात्रे, कालिदास डापके, शेषराव डापके, रामदास डापके, शिवाजी कळात्रे, अमोल डापके, अरुण कळात्रे, बालाजी कळात्रे, विजू कळात्रे, अशोक दणके यांच्यासह पालकांनी केली आहे. एखादी घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने तात्काळ नवीन शाळा इमारतीची व्यवस्था करून १०० चिमुकल्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२ सत्रात शाळा घेण्याच्या सूचना ः डीपीडीसींतर्गत सर्व शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत. लवकरच शाळांना नवीन इमारती मिळतील. खेडीलिहा येथील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, तिथल्या मुख्याध्यापकांना दोन शिफ्टमध्ये वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जि.प. च्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.