![]()
श्रावण महिन्याला सुरुवात होताच अनेक घरांमध्ये चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार यांसह विविध धार्मिक व्रत-वैकल्यांना सुरुवात होते. श्रद्धेने उपवास करण्याची परंपरा असली, तरी उपवास प्रत्येकाच्या शरीरासाठी सारखाच लाभदायी असेलच असे नाही. वय, प्रकृती, दैनंदिन शारीरिक श्रम, आधीपासून असलेले आजार आणि पावसाळ्यातील हवामान यांचा विचार करूनच उपवास करणे गरजेचे आहे. दिवसभर काहीही न खाता उपाशी राहण्यापेक्षा हलका, सहज पचणारा आणि संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी अधिक योग्य ठरते. पावसाळ्यात पचनशक्ती काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे उपवासाच्या नावाखाली साबुदाणा वडा, बटाटा वडा, भजी, तळलेले पदार्थ किंवा अतिगोड पदार्थ खाल्ल्यास गॅस, ॲसिडिटी आणि छातीत जळजळ यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे श्रद्धेसोबत शरीराची गरज ओळखून आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. उपवास करताना शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी राजगिरा, शेंगदाणे, खोबरे, गूळ, रताळे, दूध आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करता येतो. राजगिरा लाडू किंवा थालीपीठ, शिंगाडा आणि भगर (वरीचे तांदूळ) हे तुलनेने हलके पर्याय ठरू शकतात. तळलेल्या वेफर्सऐवजी भाजलेले मखाणे, सुकामेवा किंवा भाजलेले दाणे खाणे अधिक योग्य ठरते. सफरचंद, डाळिंब, पपई आणि केळी यांसारखी ताजी फळे ऊर्जा देण्यास मदत करतात. कोमट पाणी, नारळपाणी किंवा ताजे ताक घेतल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यास मदत होते. पावसाळ्यात संसर्गाचा धोका वाढतो आणि पचनशक्ती मंदावू शकते. त्यामुळे साबुदाणा वडा, भजी, बटाटा वडा, अतितेलकट थालीपीठ आणि इतर तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. कांदा, लसूण आणि तीव्र मसाल्यांचा वापरही कमी करावा. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पालेभाज्यांवर किडे व अळ्या होण्याची शक्यता असल्याने त्या काळात पालेभाज्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच वांगी वात वाढवणारे मानले जात असल्याने त्यांचे सेवनही टाळण्यास सांगितले जाते. उपवासाच्या पदार्थांमध्ये साध्या मिठाऐवजी शेंदेलोणाचा वापर केला जातो. श्रावण महिन्यातील आहाराचा मुख्य नियम सांगणारी एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे ती म्हणजे “आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा’ याचा अर्थ आषाढात तळलेले चालते, पण श्रावणात फक्त भाजलेले किंवा हलके पदार्थ खावेत. उपवास करताना स्वतःचे वय, प्रकृती आणि आजार यांचा विचार करणेही गरजेचे आहे. दिवसभर उपाशी राहून शरीराला त्रास देण्यापेक्षा थोडे-थोडे आणि हलके अन्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वरीलप्रमाणे काही गोष्टी टाळल्या आणि कांही केल्या तर विना तक्रार आपला उपवास होत शरीर निरोगी राहते. – वैद्य, अपेक्षा गुंड-भोसले, पापरी दिवसभर उपवास केल्यानंतर लगेच जड किंवा तळलेला आहार घेणे टाळावे. उपवास सोडताना हलका आणि सहज पचणारा आहार घ्यावा. मूगडाळीची खिचडी यांसारखा सौम्य आहार घेणे योग्य ठरू शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अन्न न घेता थोडे-थोडे खाणे अधिक हितकारक आहे.
Source link
आरोग्य:श्रावणातील उपवास करताना श्रद्धेसह आरोग्याचीही काळजी घ्या