Headlines

आषाढी यात्रेनंतर वाळवंट वाऱ्यावर:भाविकांची सुरक्षा विठ्ठल भरवशावर




आषाढी यात्रेनंतर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात प्रशासकीय यंत्रणा बेजबाबदार झाली आहे. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आता प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे विठ्ठलाच्याच भरवशावर सोडून दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनंतर नगरपालिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची परंपरा सुरू आहे. भाविकांच्या जिवाशी खेळणारी ही वागणूक स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये संताप निर्माण करत आहे. मंदिर समितीने महादेव कोळी समाजातील १५ युवकांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, त्यांना कोणत्याही प्राथमिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्याचे दिवस असतानाही त्यांना लाईफ जॅकेट, स्पीड बोट किंवा बोट चालवण्यासाठी आवश्यक पेट्रोल यांसारखी महत्त्वाची उपकरणे पुरवण्यात आलेली नाहीत. आश्चर्य म्हणजे, गेल्या सहा दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापनाकडे स्पीड बोट जमा केली असून, तिचा वापरही बंद आहे. पावसाळ्यामुळे उजनी वीर धरणातून पाण्याची नेहमीची आवक सुरू आहे आणि नदीतील पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. अशावेळी भाविक नदीत स्नान करताना त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. मात्र, प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी टोलवण्यात धन्यता मानत असल्याचे स्पष्टपणे दिसते. यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *