Headlines

केडीएमसीतील डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सरकारची कडक भूमिका:'मारहाण अयोग्य, चौकशी करून कारवाई होणार', आबिटकर-कदम यांचा इशारा




केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवरील मारहाणीच्या घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टरांना मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी तक्रारींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर डॉक्टरांनी संप पुकारल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला असून, याच पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मारहाण नव्हे, तक्रारीद्वारे न्याय मिळवा’ प्रकाश आबिटकर म्हणाले की, एखाद्या डॉक्टरची किंवा अधिकाऱ्याची चूक झाली असेल तर त्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून न्याय मागण्याची लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन मारहाण करणे योग्य नाही. अशा घटनांमुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल सरकारने घेतली असून त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. या कायद्यानुसार डॉक्टरांवर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर अधिक कठोर कलमांखाली कारवाई केली जाईल. सरकारी रुग्णालयांतील तक्रारींवरही कारवाई सरकारी रुग्णालयांमध्ये काही डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णांशी असंवेदनशीलपणे वागतात, अशा तक्रारींबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. अशा प्रकरणांमध्ये नागरिकांनी अधिकृत तक्रार केल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी सरकार सज्ज वसई-विरार, नालासोपारासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वीच आरोग्य यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून पावसानंतर उद्भवणाऱ्या साथीचे आजार आणि इतर आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. ‘डॉक्टरांची कमतरता नाही; भरती प्रक्रिया सुरू’ राज्यात डॉक्टरांची कमतरता असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, आवश्यकतेनुसार आरोग्य सेवेत मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच १ जुलै रोजी १,४०० डॉक्टरांच्या भरतीची घोषणा करण्यात आली असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी डॉक्टरांची संख्या कमी असेल, ती लवकरच पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. योगेश कदम म्हणाले- ‘प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई’ या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, या घटनेची सविस्तर माहिती अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती. मात्र, डॉक्टर किंवा परिचारिकांना मारहाण झाल्याचे समोर आले असेल, तर ते शंभर टक्के चुकीचे आहे. संबंधितांना काही तक्रार असेल, तर त्यांनी संबंधित विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागायला हवी होती, असे त्यांनी सांगितले. कदम यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत होणे ही गंभीर बाब असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असेही त्यांनी सांगितले. ‘कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार’ विधानसभेत नुकतेच पोलिसांना अधिक अधिकार देणाऱ्या तरतुदी मंजूर झाल्याचा उल्लेख करत योगेश कदम म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही स्थानिक पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अशा घटना घडत होत्या. नव्या कायद्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘सेवेची भावना महत्त्वाची’ रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनीही रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आबिटकर म्हणाले की, “रुग्णांना मदत करण्यासाठी आपण आहोत, ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे. सेवा देताना सहानुभूतीची भूमिका घेतली, तर नागरिकही त्याचा सकारात्मक प्रतिसाद देतील.” संबंधित बातमी वाचा… कल्याण मारहाण प्रकरण:श्रीकांत शिंदेंचे कठोर कारवाईचे आदेश; गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, संजय राऊतांचा संताप कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *