![]()
अमरावती शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत २२.०७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३,६३,४७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सैफ अली आसिफ अली (वय ३२, रा. फरीद नगर), आवेजउद्दीन नासीरउद्दीन (वय २०, रा. हैदरपुरा) आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद जफर (वय २४, रा. गौस नगर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी सैफ अली याची चौकशी केली असता, त्याने हे एम.डी. पावडर नागपूर येथील इरशाद खान ऊर्फ अरशद याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील अवैध अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ राबवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करत होते. या पथकाला एका खात्रीलायक बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सैफ अली आसिफ अली आपल्या दोन साथीदारांसह नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी डॅमकडे जाणाऱ्या रोडने एम.डी. पावडर विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने वाळकी डॅम रोड येथे सापळा रचला आणि संशयास्पदरित्या आलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या अंगझडतीमध्ये २२.०७ ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत रु. ३,०१,२००/-), १ किलो १२४ ग्रॅम गांजा (किंमत रु. २२,२७०/-) आणि ४० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ६३ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर, सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले, पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने व त्यांच्या पथकाने केली.
Source link
अमरावतीत 22 ग्रॅम एमडी, 1 किलो गांजा जप्त:तिघांना अटक, 3.63 लाखांचा मुद्देमाल हस्तगत