![]()
तालुक्यातील अंतापूर, केसापूर आणि वैसपूर या पुनर्वसित गावांमधील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची कमालीची दुरवस्था झाली असून, विद्यार्थी आणि शिक्षक रोज आपला जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. पावसाचे पाणी थेट वर्गात पडत असल्याने मुले भिजत शिक्षण घेत आहेत. या भीषण परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट वर्गात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून नवीन शाळा इमारतीची मागणी केली. हा प्रकार जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत आणि डॉ. संजय गव्हाणे यांच्या दौऱ्यादरम्यान समोर आला. शाळेची स्थापना १९९४ ची असून, तेव्हापासून दुरुस्ती झालेली नाही. २९ सप्टेंबर २०२५ रोजी शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळले होते. सुदैवाने त्या दिवशी अतिवृष्टीमुळे तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुट्टी जाहीर केल्याने जीवितहानी टळली होती, अशी माहिती मुख्याध्यापक सुभाष भोये यांनी दिली. या शाळांची उपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड खपवून घेणार नाही, असा इशारा डॉ. संजय गव्हाणे, डॉ. तृप्ती राजपूत आणि डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी प्रशासनाला दिला आहे. तालुक्यातील ६५ शाळा खोल्यांची पडझड झाली आहे. आम्ही जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दिला, पण मंजुरी मिळाली नाही. ‘समग्र शिक्षा’चा दिल्लीहून येणारा निधी दोन वर्षांपासून आलेलाच नाही, असे समग्र शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता अमोल अत्रे यांनी सांगितले. साप-बिबट्याचीही भीती देभेगाव केंद्रांतर्गत अंतापूर येथे पहिली ते चौथीपर्यंतची जि. प. प्राथमिक शाळा आहे. प्रांजल गायकवाड, प्रतीक्षा केवट, अख्सार शेख या चिमुकल्यांनी सांगितले की, छताचे प्लास्टर सतत अंगावर पडते. त्यातच पाऊस आल्यास वर्गखोल्या पाणचक्कीसारख्या गळतात. शाळेला संरक्षक भिंत, स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणी नाही. बाजूलाच मुकुंद ओढा असल्याने शाळेत साप येतात, तर परिसरात बिबट्या आणि माकडांचा वावर असतो. शौचालय नसल्याने विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांची मोठी कुचंबणा होत आहे, अशी माहिती नंदा पाटेकर व शिक्षिका ललिता कामटे यांनी दिली. जनगणनेच्या कामात व्यस्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू यांनी निर्देश दिल्याप्रमाणे केंद्र प्रमुखांच्या पथकाद्वारे कन्नड तालुक्यातील धोकादायक शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सध्या आम्ही जनगणनेच्या कामात व्यस्त आहोत. मी संबंधित अभियंत्यांशी बोलून सांगते. -सबाहत मोहम्मद नईमोद्दीन, गट शिक्षणाधिकारी
Source link
अंतापूर जि. प. शाळेची दुरवस्था; छत कोसळण्याच्या स्थितीत