Headlines

FDA ची राज्यभरात मोठी कारवाई:पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना औषधे जप्त; दोन हॉस्पिटलच्या मेडिकलवरही कारवाई




अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात बेकायदेशीर औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दिनांक ८ ते १० जुलै २०२६ दरम्यान राज्याच्या विविध भागांत टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, रुग्णांना औषध खरेदीची सक्ती करणाऱ्या हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. नांदेड: ‘अफराह कलेक्शन’मधून ३९.७० लाखांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त नांदेड पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संयुक्त कारवाई करत ‘मे. अफराह कलेक्शन’ या दुकानात छापा टाकला. या ठिकाणी पाकिस्तानात उत्पादित होणाऱ्या आणि बंदी असलेल्या ‘गोरी ब्युटी क्रिम’, ‘फेस फ्रेश ब्युटी क्रिम’, ‘उजुबा एक्स्ट्रा व्हाईट’ आणि ‘गोल्ड ग्लिम’ या सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा आढळला. या मालाची कोणतीही खरेदी बिले दुकानदाराकडे नव्हती. एफडीएने यातील ३ नमुने तपासणीसाठी पाठवले असून, उर्वरित ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, ३१८(४) आणि विदेश व्यापार अधिनियम १९९२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे: ‘कल्पतरू आयुर्वेद’वर छापा; ५०.३६ लाखांची विनापरवाना औषधे जप्त पुण्यातील शुक्रवार पेठ येथील ‘कल्पतरू आयुर्वेद’ या पेढीवर औषध निरीक्षकांनी छापा टाकून विनापरवाना भस्म आणि रस औषधांची विक्री उघडकीस आणली. जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्या, बरण्या आणि बाटल्यांवरील भस्म साठ्यावर बॅच क्रमांक, उत्पादन/मुदतबाह्य तारीख, उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक अशी कोणतीही अनिवार्य माहिती नव्हती. प्रोप्रायटर राकेश राजेश शिर्के या मालाची कोणतीही कायदेशीर कागदपत्रे दाखवू शकले नाहीत. त्यामुळे एफडीएने ५०.३६ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर : मे. कृपामाई हेल्थकेअर प्रा. लि.चा परवाना रद्द कृपामाई हॉस्पिटलमधील एका कर्करोगग्रस्त (कॅन्सर) रुग्णाला केमोथेरपीसाठी आवश्यक असलेले ‘सिस्प्लाटिन इंजेक्शन’ बाहेरून आणण्यास मनाई करण्यात आली होती. केवळ हॉस्पिटलच्याच मेडिकलमधून ते खरेदी करण्याची सक्ती केल्याने रुग्णाच्या उपचारास विलंब झाला. तपासणीत फार्मासिस्ट गैरहजर असणे, शेड्युल एच/एच-१ औषधांच्या नोंदीत तफावत असणे आणि “बाहेरून औषध आणण्यास मनाई नाही” असा फलक न लावणे यांमुळे या मेडिकलचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. सोलापूर : नोबल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल स्टोअरला व्यवसाय बंदचे आदेश रुग्णांना औषध खरेदीची सक्ती होत असल्याच्या तक्रारीवरून येथे तपासणी करण्यात आली. यात रुग्णांना प्रिस्क्रिप्शन न देणे, ‘शेड्युल एच’ व ‘एच-१’ ची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणे, थंड तापमानाची औषधे रॅकवर उघडी ठेवणे, आणि मुदतबाह्य (Expired) औषधे वेगळी न ठेवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने या मेडिकलला तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीड: ‘भ्रामक दावे’ करणाऱ्या गोरेपणाच्या क्रिमवर कारवाई बीड येथील नगर रोडवरील ‘मे. मंगलमुर्ती एजन्सीज’ येथे ९ जुलै रोजी केलेल्या कारवाईत ‘मेरा रूप श्रृंगार क्रिम’ (Mera Roop Shringar Cream) या उत्पादनाचा ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या क्रिमच्या पॅकिंगवर ‘रेडिअंट अँड नॅशनल ग्लो’, ‘ब्लेमिश फ्री स्किन’ असे दिशाभूल करणारे आणि आक्षेपार्ह दावे करण्यात आले होते, जे कायद्यानुसार बेकायदेशीर आहेत. नागरिकांना ‘एफडीए’चे आवाहन राज्यभरात अनधिकृत, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या औषध आणि सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती व विक्रीविरुद्ध ही मोहीम अशीच तीव्र सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी सांगितले. नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराची किंवा संशयास्पद उत्पादनांची माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या एफडीए कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *