![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री उशिरा एका घरावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड, साडेसहा हजार जिवंत काडतुसे, २१ विविध प्रकारची घातक हत्यारे, विदेशी दारू आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ५ कोटी ६३ लाख ३७ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, मिटमिटा परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रक्कम व अग्निशस्त्रे लपवून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित घरावर छापा मारला. त्यावेळी घरात शिला साळवे नावाची महिला हजर असल्याचे आढळून आले. घराची कसून झडती घेतली असता पोलिसांना १००, २००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची बेहिशोबी रोकड मिळाली. तसेच, २ पिस्तूल (मॅगझिनसह), ४ रायफल (१२ इंच बोअर, एअर गन आणि .२२), १ तलवार आणि १७ चाकू/गुप्ती अशी एकूण २१ हत्यारे जप्त करण्यात आली, ज्यांची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. यापैकी ४ शस्त्रांचे परवाने एका मृत व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत १२ बोअरची ६३२, ७.६५ एमएमची १८७८ आणि .२२ ची ३८४० अशी एकूण ६३५० जिवंत काडतुसे (किंमत ५ लाख ५० हजार रुपये) हस्तगत करण्यात आली. याव्यतिरिक्त, १५१.३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत २१,३४,३५० रुपये), ३.९ किलो वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ८,०९,२४८ रुपये) आणि विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या ४५ बाटल्या (किंमत ३४,८३६ रुपये) देखील जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार योगेश नवसारे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास छावणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव करत आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली. जप्त केलेल्या बेहिशोबी रोकडबाबत आयकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे.
Source link
मिटमिटात 5.26 कोटींची बेहिशोबी रोकड जप्त:गुन्हे शाखेच्या छाप्यात साडेसहा हजार काडतुसे, 21 शस्त्रेही सापडली