Headlines

80 तासांनी मोशीच्या कचरा ढिगाऱ्यामधून 7 मृतदेह बाहेर:एकूण बळींची संख्या 8 वर, मृतांत छत्रपती संभाजीनगरचा तरुण




पुण्याजवळील मोशी येथील कचरा डेपोत तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ८० तासांनंतर टप्प्याटप्याने शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाचाही समावेश आहे. त्यासोबत दुर्घटनेतील एकूण बळींचा आकडा ८ वर पोहोचला. एकाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे आव्हान बचाव दलापुढे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील मोशी येथे अँटोनी लॉरा रिन्युएबल एनर्जीच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाजवळ बुधवारी कचऱ्याचा मोठा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळला होता. या ढिगाऱ्याखाली दबलेल्या एकूण २३ पैकी १४ जणांना बाहेर काढण्यात घटनेच्या तसेच दुसऱ्याच दिवशी यश आले होते. मात्र, नंतर संथगतीने चाललेल्या बचावकार्यामुळे नातेवाइकांनी आक्रोश केला. केवळ तळमजल्याचीच परवानगी, आयुक्त तोंडघशी या इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला इमारत वैध असल्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले होते. आता मात्र त्यांनी घुमजाव केला. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, मनपाच्या पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी संजय कुलकर्णी आणि उपअभियंता योगेश आल्हाट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही जोर धरत आहे. सुनेत्रा पवार घटनास्थळी, बचावकार्याचा आढावा सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. फर्स्ट पर्सन : विजय सपकाळ, बचावलेला तरुण स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत होता, मी जमिनीवर सरपटत होतो. माझ्या पायावर ग्रेनाइट पडल्याने रक्तस्राव होत होता आणि जखम झाली होती. माझ्या अंगावर कधीही स्लॅब पडेल अशी भयंकर स्थिती होती. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी मी जमिनीवर सरपटत पुढे सरकत होतो. माझ्या मित्राच्या अंगावरही स्लॅब पडला होता, त्यालाही वाचवण्याचा मी शर्थीचा प्रयत्न केला. राजकीय दबाव, प्रशासकीय लागेबांधे पुणे शहरातील रोजचा १२०० ते १३०० मेट्रिक टन कचरा मोशी येथील ८१ एकर जागेत गेल्या ४० वर्षांपासून साठवला जात आहे. कचरा विल्हेवाटीसाठी २०२३ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. मात्र, कामगारांच्या सुरक्षेसाठी येथे कोणतीही ठोस उपाययोजना नव्हती. अत्यंत संवेदनशील ठिकाणी इमारत उभी राहीपर्यंत प्रशासनाचे लक्ष का गेले नाही, हा मोठा प्रश्न आहे. अवघ्या काही तासात तळमजल्याला परवानगी दिली गेली. तरीही कुणी आक्षेप घेतला नाही हा मुद्दाही गंभीरपणे समोर आला आहे. यातूनच कंपनीतील प्रशासकीय आणि राजकीय लागेबांधे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय दबाव, लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंध स्पष्ट होतात. यामुळेच निष्पापांचे बळी गेल्याचे आरोप होत आहेत. बुधवारी दुपारी १.४० वाजता दुर्घटना झाली. भावेश वाणी (३३, जळगाव) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी मिळाला. नंतर ८० तासांत शनिवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने मृतदेह हाती लागले, ते असे… दुपारी २ ः ५० वा. अक्षय सावंत (२८,मोशी)
सायं. ५.१० वा. सुनील कोरके (४०, मोशी)
सायं. ६.०० वा. सन्नी माने (३९,मोशी)
सायं. ६.१० वा. महेश कुंभार (३३, छत्रपती संभाजीनगरचा तरुण)
सायं. ६.२० वा. नागेश गायकवाड (२६,मोशी)
सायं. ७.१५ वा. रणजित पाटील (२२, मोशी)
रात्री १० वा. राहुल गायकवाड (३५, मोशी)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *