![]()
हदगाव तालुक्यातील नेवरी येथील एका बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह वारंगाफाटा शिवारात रविवारी ता. १२ दुपारी आढळून आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहेे. व्यक्तीच्या मृतदेहाचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील नेवरी येथील प्रशांत इंगळे (३९) हे भुसारचा व्यवसाय व शेती करतात. गुरुवारी ता. ९ प्रशांत हे त्यांच्या दुचाकी वाहनावर नांदेड येथून कोळी (रा. हदगाव) येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपून सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते परत नांदेडकडे जाण्यासाठी आखाडा बाळापूर मार्गे निघाले होते. मात्र रात्री उशीरापर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. दरम्यान, प्रशांत हे वारंगाफाटा पर्यंत पोहोचल्याचे दिसून आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली होती. त्यावरून पोलिसांनी प्रशांत हे बेपत्ता झाल्याचे नोंद घेऊन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यांनतर आज दुपारी वारंगाफाटा शिवारात हदगाव रोडवर एका नालीच्या बाजूला असलेल्या खोल जागेवर त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद मरे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, रोहीनकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी जोगदंड, जमदार संतोष नागरगोजे, प्रशांत शिंदे, विठ्ठल जाधव, यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. पोलिस व नातेवाईकांनी मयत प्रशांत यांचा मृतदेह बाहेर काढून डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. मयत प्रशांत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेमुळे नेवरी गावावर शोककळा पसरली आहे.
Source link
नेवरीच्या बेपत्ता व्यक्तीचा वारंगाफाटा शिवारात सापडला मृतदेह:आखाडा बाळापूर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, मृत्यूचे कारण अस्पष्ट