![]()
अहिल्यानगर–दौंड महामार्गावर अहिल्यानगर तालुक्यातील खंडाळा परिसरात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. मात्र, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संदेश कार्ले व स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या
.
एका ट्रकचा चालक काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, त्याला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तर दुसऱ्या ट्रकमध्ये चालक आणि क्लिनर अडकले होते. ग्रामस्थांनी प्रयत्न करून त्या दोघांनाही बाहेर काढले. ते बाहेर येताच काही क्षणांतच दोन्ही ट्रकने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने काही वेळातच गाड्यांतील पाणी संपले.
त्यानंतर जवळील शेतातील विहिरीतील पाण्याच्या साहाय्याने अग्निशमन बंब पुन्हा भरून आणि जेसीबीच्या मदतीने ट्रकमधील कापडाचे गठ्ठे बाहेर काढून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
अपघातापेक्षा ‘यंत्रणेनेच’ दिला मोठा धक्का! अपघातानंतर जखमींना वेळेत उपचार मिळणे अपेक्षित असताना प्रत्येक टप्प्यावर सरकारी व खाजगी यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र समोर आले. खंडाळा गावातील शासकीय रुग्णवाहिका सुरूच होत नसल्याने संदेश कार्ले यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथेही रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अखेर जखमींना घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) गाठले, तर तेथेही रुग्णाला स्ट्रेचरवर नेण्यासाठी कर्मचारी वेळेवर पुढे आले नाहीत. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि बचाव पथकांचा समन्वय व तत्परता किती ढासळली आहे, याचे हे जिवंत उदाहरण यानिमित्त समोर आले असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.