![]()
माढा सीना नदीच्या महापुरामुळे उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू होती. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत दिव्य मराठीने ११ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तत्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात माढा-तुळजापूर राज्य मार्गावरील उंदरगावजवळील पुलावरील डांबरीकरण वाहून गेले होते. परिणामी पुलावर मोठे खड्डे पडले. काही ठिकाणी स्टीलही उघडे पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. दुचाकीस्वार आणि महिलांचे किरकोळ अपघात वारंवार घडत होते. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. दिव्य मराठीच्या वृत्तानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हालचाल करत पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. फक्त खड्डे नको, रस्त्याचे नुतनीकरण हवे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याचे आम्ही स्वागत करतो. परंतु पुलाचे ऑडिट करणे गरजेचे आहे. केवळ पुलावरील खड्डे न बुजविता उंदरगांव ते जामगांवपर्यंत रस्त्याचे नुतनीकरण होणे आवश्यक असून भविष्यात अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे. -गणेश चव्हाण, जिल्हा सचिव, मराठा महासंघ दोन महिन्यात सर्व खड्डे बुजवू उंदरगांव ते जामगांव रस्त्याच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तो अद्याप मंजूर झालेला नाही. पहिल्या टप्प्यात पुलावरील खड्डे बुजविले जात आहेत. पुढील दोन महिन्यांत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविण्यात येतील. – एम. एच. सय्यद, कनिष्ठ अभियंता
Source link
दिव्य मराठी इम्पॅक्ट:उंदरगाव-केवडला जोडणाऱ्या सीना नदीपुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू