![]()
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या माफियांविरोधात अमरावती ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. १३) पहाटे कारवाई केली आहे. नागपूर ते अमरावती हायवेवर तिवसा येथे पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपयांचा गुटखा व १६ लाखांचा ट्रक असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. यावेळी गुटखा घेवून येणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांना १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अब्दुल रफिक अब्दुल शब्बीर (३५, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) आणि अर्शद खान रहमत खान (३०, रा. ताज नगर, पठाण चौक) या दोघांना पकडले आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्याचे कडक आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, १३ जुलैला एलसीबीचे पीआय अशोक लोंडे यांच्या नेतृत्वात पीएसआय सागर हटवार यांचे पथक तिवसा परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी नागपूरकडून एका ट्रकमध्ये गुटख्याची मोठी खेप अमरावतीच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास संशयास्पद ट्रक येताना दिसताच पोलिसांनी तो अडवला. पोलिसांनी ट्रकची कसून झडती घेतली असता, पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या १३० मोठ्या नायलॉन बोऱ्यांमध्ये लपवून ठेवलेला शासन प्रतिबंधित गुटख्याचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला. वाहतूक मार्ग बदलवण्याचा संशय एलसीबीने जप्त केलेला हा गुटखा अमरावती शहरात येत असल्याची चर्चा आहे. तसेच हा गुटखा मध्यप्रदेशातून आला असल्याच्या प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलिस पोहचले आहे. मागील महिन्यात ग्रामिण पोलिसांनी गुटख्याच्या मोठ्या बहूतांश कारवाई या मोर्शी, वरुड मार्गावरच केल्या आहेत. म्हणूनच यावेळी गुटखा तस्करांनी शक्कल लढवून मार्ग बदलविला मात्र तरीही ते एलसीबीच्या जाळ्यात अडकले. पोलिस कस्टडीत असलेल्या आरोपींच्या सुक्ष्म चौकशीत या रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार लवकरच उघड करण्याची शक्यता आहे.
Source link
39 लाखांच्या गुटख्यासह एलसीबीने दोघांना पकडले:तिवसा येथे ग्रामिण पोलिसांनी पहाटेदरम्यान कारवाई