Headlines

MPSC ऑनलाइन परीक्षा लादणार नाही:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आंदोलन स्थगित




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत उद्या स्वतंत्र बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा केली जाईल. सद्यस्थितीत ऑनलाईन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही. भविष्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार झाल्यास, सर्व स्पर्धा परीक्षा एकाच वेळी त्या पद्धतीने घेता येतील अशी सक्षम व विश्वासार्ह यंत्रणा उभारल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, १७ जुलैपर्यंत सुरू असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘क’) अर्ज प्रक्रियेबाबतही पुनर्विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससी अध्यक्ष व सचिव यांच्यासोबतच्या बैठकीनंतर विद्यार्थी प्रतिनिधींसोबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, त्यात पुढील भूमिका आणि निर्णयाची सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. या चर्चेनंतर आणि मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन परीक्षेचा निर्णय स्थगित करण्याबाबत दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे, विद्यार्थ्यांनी पुण्यात आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, राजेश पांडे आणि राज देशमुख यांनीही विद्यार्थ्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि मीडिया विभागाचे चेअरमन अक्षय जैन यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली. ऑनलाईन परीक्षा लादू नये आणि सक्षम यंत्रणा उभारल्यानंतरच भविष्यात निर्णय घ्यावा, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत ऑनलाईन परीक्षेचा निर्णय स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेचे अनिकेत देशमाने यांनीही बैठकीतील विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, डिजिटल असमानता आणि ऑनलाईन परीक्षेबाबतच्या व्यावहारिक अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन परीक्षा लादली जाणार नाही आणि एमपीएससीसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. अधिकृत निर्णय येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा सुरूच राहील, असे देशमाने यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *