Headlines

नितीन गडकरींची इथेनॉलवरून सोशल मीडियावर बदनामी:युट्यूबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हा दाखल




केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी बिहारच्या एका युट्यूबरला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल निर्मितीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी युट्यूबर मनीष कश्यपसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी शिशिर त्रिपाठी, संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर गडकरींची बदनामी करण्यात आली. ३ जुलै रोजी ‘मनीष कश्यप बिहार’ या युट्युब चॅनलवरून इथेनॉल संदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये नितीन गडकरी यांच्या धोरणांवर आणि व्यक्तिमत्त्वावर तथ्यहीन व दिशाभूल करणारे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ युट्युबच नव्हे, तर इन्स्टाग्रामवरही या चुकीच्या माहितीचा प्रसार करण्यात आला. ‘देसी बॉईज’, ‘हर्षित राठी’ आणि ‘अंकलेश इनवाती’ या तीन इन्स्टाग्राम अकाऊंट्सवरूनही अशाच प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नितीन गडकरी यांची असलेली प्रतिमा मलीन करणे, समाजात गैरसमज पसरवणे आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणण्याच्या उद्देशानेच हा कट रचण्यात आला होता. पुराव्यासाठी सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ आणि पोस्टचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत नागपूर सायबर पोलिसांनी मनीष कश्यप आणि इतर तीन इन्स्टाग्राम युजर्सविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे (२९६, ३५२, ३५६) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सायबर सेलच्या तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाचीही बदनामी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर पावले उचलली जातील. पोलिसांचे एक पथक आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *