![]()
शिवाजीनगर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले मार्केटमधील वेलनेस स्पा सेंटरवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री धाड टाकली. स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक फरार झाला आहे. महात्मा फुले मार्केटमधील वेलनेस स्पा सेंटरमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी रात्री पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रकाराची खात्री केली. त्यानंतर पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान सात महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणाशी संबंधित तिघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, कारवाईची चाहूल लागताच स्पा सेंटरचा मालक पसार झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Source link
नांदेडमध्ये स्पाच्या नावाखाली देहव्यापार:सात महिलांची सुटका; तिघांना अटक, मालक फरार